रेश्मा राईकवार
‘आदिपुरुष’ची प्रदर्शनाच्या पहिल्या आठवडय़ातील जादू ओसरली आणि दुसऱ्या आठवडय़ात आपोआपच चित्रपटगृहातील त्याचे शो कमी झाले. मात्र नव्या चित्रपटांच्या नावाने सुन्या-सुन्याच असलेल्या या आठवडय़ात मराठीत ‘विठ्ठल माझा सोबती’ हा संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नावातच गोष्ट स्पष्ट करणारा हा चित्रपट आषाढीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला एक साधासरळ आणि ठरावीक साच्यातील मांडणी असलेला भक्तिपट आहे.
भक्त संकटात असला की विठूराया स्वत:च त्याच्या मदतीसाठी धावून येतो. अनेकदा न चुकता दरवर्षी पंढरीची वारी करणाऱ्या भक्ताला कधीकाळी वारी चुकलीच तर पांडुरंग स्वत: त्याला दर्शन देतो या दृढ भक्तिभावनेचा आधार घेत ‘विठ्ठल माझा सोबती’ची कथा रचण्यात आली आहे. चित्रपटाची कथा संदीप मनोहर नवरे यांचीच आहे तर पटकथा-संवाद लेखन विक्रम एडके यांचे आहे. अनेकदा अशा चित्रपटांमध्ये कथा सांगण्याचा उद्देश स्पष्ट असतो, त्यामुळे कथेची मांडणी एकाच सकारात्मक साचेबद्ध मांडणीची असते. इथे काळं आणि पांढरं या दोनच वृत्ती असतात, मात्र देवावर श्रद्धा असेल तर काळं मनही निर्मळ शुभ्र धवल झाल्याशिवाय राहात नाही हा एकच विचार इथे महत्त्वाचा असतो. हे सगळे आडाखे लक्षात घेऊनच या चित्रपटाच्या कथेची मांडणी करण्यात आली आहे. देशमुख कुटुंबाची गोष्ट चित्रपटात पाहायला मिळते. दादासाहेब देशमुख हे निस्सीम विठ्ठलभक्त. वारकरी असलेल्या दादासाहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीपणे काम करत आपला व्यवसायवृक्ष चांगलाच विस्तारला आहे. इतका की या चार-पाच फॅक्टरींच्या व्यवसाय वृक्षाखाली सुशेगात वावरणारी दादासाहेबांची मुलगी ललिता (अश्विनी कुलकर्णी), जावई रमेश (राजेंद्र शिसाटकर) आणि मुलगा शशांक (आशय कुलकर्णी) या तिघांनाही ना दादासाहेबांच्या भावनांविषयी काही देणंघेणं आहे ना स्वत:ला काम करण्याची काही इच्छा आहे. वडिलांच्या पैशावर ऐषोरामात लोळणे यापलीकडे काही न करणाऱ्या या तिघांना वठणीवर आणून आपल्या घराची विस्कटलेली घडी कशी सावरायची ही चिंता दादासाहेबांना आतल्या आत सतावते आहे. याच चिंतेत असलेले दादासाहेब आपल्या मालमत्तेबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतात आणि हे तिघेही या निर्णयामुळे दादासाहेबांच्या विरोधात जातात. अखेर या परिस्थितीत विठ्ठल नावाच्या इसमाचा (संदीप पाठक) देशमुखांच्या घरात प्रवेश होतो. त्यानंतर काय घडामोडी घडत जातात हे सांगत वाईटाला चांगल्याच्या दिशेने वळवणं शक्य आहे हे मांडण्याचा ढोबळ प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारच्या भक्तिपटाची एक ठरावीक मांडणी असते, ‘विठ्ठल माझा सोबती’ हा चित्रपटही याला अपवाद नाही. दादासाहेबांची गोष्ट पाहताना साहजिकच आपल्या चार आळशी मुलांना संपत्तीचे आमिष दाखवून शेत नांगरायला लावणाऱ्या शेतकऱ्याच्या गोष्टीची आठवण होते. त्याही गोष्टीत नाटय़ होते असं म्हणायला हवं त्या तुलनेत ‘विठ्ठल माझा सोबती’ची कथा फारच सरधोपट आहे. श्रीमंताचं घर वाटावं असा एकच एक बंगला आणि एक फॅक्टरी या दोनच पार्श्वभूमीवर बहुतांशी सगळा चित्रपट घडतो. ललिता-रमेश, शशांक आणि सुमन या चारही व्यक्तिरेखा, त्यांच्या उपकथा एवढंच नव्हे तर त्यांच्या तोंडचे संवादही काही ठरावीक ठोकताळय़ांचा आधार घेत रचलेले आहेत. त्यात नावीन्य काही नाही. अभिनयाचा विचार करता दादासाहेबांच्या भूमिकेत अभिनेते अरुण नलावडे अगदी फिट बसले आहेत. बाकी आशय, अश्विनी, राजेंद्र आणि सुमनची भूमिका करणाऱ्या दिव्या पुगावकर यांच्या वाटय़ाला फार काही वेगळं करण्याची संधी आलेली नाही. विठ्ठलाच्या भूमिकेतील अभिनेता संदीप पाठक यांनी या संपूर्ण चित्रपटात काही गंमत आणली आहे. अर्थात. चित्रपट प्रामुख्याने त्यांच्याभोवतीच फिरतो आणि हे लक्षात घेत त्यांनी संधीचा योग्य उपयोग करून घेतला आहे. चित्रपटाला गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांनी संगीत दिलं आहे. ‘देवाचिये द्वारी’ हा वेगळय़ा पद्धतीने गायलेला अभंग आणि ‘देव विठूराया’ ही दोन गाणी ऐकायला छान वाटतात. बाकी एक साधीसरळ देव आणि भक्ताची गोष्ट सांगणारा चित्रपट यापलीकडे ‘विठ्ठल माझा सोबती’ वेगळं काही देत नाही.
विठ्ठल माझा सोबती
दिग्दर्शक – संदीप मनोहर नवरे कलाकार – अरुण नलावडे, संदीप पाठक, अश्विनी कुलकर्णी, राजेंद्र शिसाटकर, आशय कुलकर्णी, दिव्या पुगांवकर.