मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील मालिका तसेच चित्रपटांमधून विठ्ठलावर आधारित अनेक कथानकं सादर झाली आहेत. ‘सावळ्या विठ्ठला’वर आधारित असलेल्या या सर्व कलाकृती प्रेक्षकांनादेखील आवडत आहेत. अशा या अखंड विठ्ठलवेड्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘विठ्ठल’ असं या सिनेमाचं नाव असून, दशरथ सिंग राठोर आणि उमेद सिंग राज पुरोहित यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्राला हरिनामाच्या गजरात तल्लीन करण्यास येत आहे. राजीव रुईया यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर फर्स्ट लुक लाँच करण्यात आला.

‘विठ्ठल’ या सिनेमाच्या नावातच हरीचा उद्गार असल्याकारणामुळे, अखंड वारकरी संप्रदायासाठी हा सिनेमा पर्वणी ठरणार आहे. या सिनेमात विठ्ठल एका आगळ्यावेगळ्या स्वरुपात वावरताना दिसून येणार असल्याकारणामुळे, या मूर्तरुपी विठ्ठलाची व्यक्तिरेखा कोण साकारतोय, हे सध्या गुपित ठेवण्यात आलं आहे. मात्र, या सिनेमात मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेची देखील भूमिका असल्याचं समजतंय. तसंच अशोक समर्थ, हर्षदा विजय, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे. पंढरीच्या परब्रह्माचे मोठ्या पडद्यावरील हे रूप पाहण्यास प्रेक्षकदेखील आतुर झाले असतील हे निश्चित !

Story img Loader