सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशातच दिल्लीमध्येही भाजपाने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत, ‘चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा युट्यूबवर प्रदर्शित करा सर्वजण मोफत पाहतील.’ असं म्हटलं होतं. यावर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एएनआयच्या रिपोर्टनुसार, ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच माखनलाल चतुर्वेदी नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिजम अँड कम्युनिकेशन, भोपाळमध्ये चित्रा भारती फिल्म फेस्टिव्हलला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एका पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, ‘काही लोकांना तर असं वाटतं की देवानं पृथ्वीवर यावं. आपण नेहमी अशा मूर्ख लोकांपासून जपून राहायला हवं. त्यांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही.’
आणखी वाचा- “एवढी कमाई केली आहे तर मग…” ‘द कश्मीर फाइल्स’ वादावर तापसी पन्नूची प्रतिक्रिया चर्चेत
याशिवाय या आधी अभिनेता अनुपम खेर यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, ‘मित्रांनो आता तर चित्रपटगृहात जाऊनच द काश्मीर फाइल्स बघा. तुम्हाला ३२ वर्षांनंतर #KashmiriHinds चे दु:ख कळले आहे. त्यांच्यावर झालेला अत्याचार समजून घ्या. त्यांच्याशी सहानुभूती दाखवा, पण जे लोक या शोकांतिकेची चेष्टा करत आहेत. कृपया त्यांना तुमच्या शक्तीची जाणीव करून द्या.’ असं म्हटलं होतं. अनुपम यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं.
आणखी वाचा- The Kashmir Files बाबत फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भडकल्या पल्लवी जोशी, म्हणाल्या…
दरम्यान ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं असलं तरी आज भारतात एक वर्ग असाही आहे. ज्यांनी या चित्रपटाला सातत्यानं विरोध केला आहे. काही लोकांच्या मते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटात सत्याची तोडमोड करून कथा मांडली आहे. ज्यामुळे मुस्लीम लोकांचा तिरस्कार केला जात आहे. मात्र यावर विवेक अग्निहोत्रींचं म्हणणं आहे की त्यांनी या चित्रपटात केवळ सत्य घटना दाखवली आहे. मात्र आता त्यांना यावरुन काहीही कारण नसताना वादात ओढलं जात आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.