२०२२मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. १९९०मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला. पण प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाकडे पाठ न फिरवता ‘द कश्मीर फाइल्स’ला उत्तम प्रतिसाद दिला. आता चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) या चित्रपटाचा सीक्वेल घेऊन येत आहेत.

विवेक यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या सीक्वेलची माहिती देताना ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी काही पक्षांना, अतिरेकी संघटंनांना डिवचत आपण त्यांना नाराज करणार नाही असं देखील म्हटलं आहे. विवेक यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं की, “खूप साऱ्या दहशतवादी संघटना,पाकिस्तानी लोक,कॉंग्रेस,आम आदमी पार्टी आणि आता शिवसेना तसंच अर्बन नक्षलवादी देखील मला ‘द काश्मिर फाईल्स २’ संदर्भात विचारत आहेत. मी तुम्हा सर्वांना वचन देतो की मी कुणालाच निराश करणार नाही. फक्त तुम्ही आपली इम्युनिटी वाढवायला सुरुवात करा.” विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ मध्ये विवेक अग्निहोत्री यांनी ९० सालातील काश्मिरी पंडितांचा पलायनवाद, त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारावर भाष्य करत मोठ्या पडद्यावर ते दाखवण्याचं धाडस केलं होतं. चित्रपटाला पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आता विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मिर फाईल्स २’ चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचं ठरवलं असून याचं नाव ‘द दिल्ली फाईल्स’ ठेवलं आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. केवळ २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली.

‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार आणि मिथुन चक्रवर्ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. विवेक अग्निहोत्रींचा चित्रपट लोकांना आवडला, तर काहींना त्यावर टीकाही केली. प्रकाश राज ते नाना पाटेकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका केली होती. या चित्रपटाचे वर्णन समाजात फूट पाडणारा म्हणूनही केले गेले.

Story img Loader