दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या खूप चर्चेत आहेत. त्याचा ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. त्यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून काश्मिरमधील भीषण परिस्थितीवर भाष्य केले आहे. काश्मिरी पंडितांवर होणारा अन्याय या सारख्या ज्वलंत विषयावर चित्रपट बनवण्याचे धाडस विवेक यांनी केले आहे. ते नेहमीच या विषयावर व्यक्त होत असतात. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय आहेत. सोशल मीडियाद्वारे ते वेगवेगळ्या घटनांवर आपले मत मांडतात.
काही दिवसांपूर्वी विवेक यांनी ‘द चार्वाक पॉडकास्ट’ या चॅनलला लाईव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान विवेक यांनी देशातील सध्याची परिस्थिती, काश्मीर प्रश्न, त्यांचा चित्रपट अशा बऱ्याच विषयांवर गप्पा मारल्या. तसेच त्यांनी या कार्यक्रमामध्ये लेखक-गीतकार जावेद अख्तर यांचं कौतुक केलं. ‘लगान’ चित्रपटाची गाणी जावेद यांनी लिहिली होती. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “जावेद अख्तर यांनी ‘लगान’ चित्रपटासाठी शुद्ध हिंदी भाषेमध्ये भजन लिहिली आहेत. ‘मधूबन में राधा..’ या गाण्यात एकाही उर्दू शब्दाचा उल्लेख नाही. असे होऊ शकले, कारण ही शिक्षित, हुशार माणसं आपल्या देशाच्या मातीशी जोडलेली आहेत. जावेद साम्यवादी विचारांचे आहेत. ते उजव्या विचारसरणीच्या विरोधात असले, तरी ते या देशाशी प्रामाणिक आहेत.”
आणखी वाचा- “त्याला ‘ब्रह्मास्त्र’चा अर्थही माहीत नाही…” विवेक अग्निहोत्रींनी उडवली अयान मुखर्जीची खिल्ली
जावेद अख्तर हे दिग्गज गीतकार आहेत. त्यांनी ‘लगान’, ‘बॉर्डर’, ‘ओम शांती ओम’ अशा बऱ्याच चित्रपटांची गाणी लिहिली आहेत. सलीम खान आणि त्यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. त्यांनी मिळून लिहिलेले ‘जंजीर’, ‘दिवार’, ‘शोले’ सारखे अनेक हिंदी चित्रपट सुपरहिट ठरले. द चार्वाक पॉडकास्टच्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी जावेद यांच्या लेखन कौशल्याचेही कौतुक केले. जावेद यांनी लिहिलेल्या पात्रांविषयी बोलताना ते म्हणाले, “जावेद अख्तर यांच्या चित्रपटातील नायक हा नेहमी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवत असतो. त्यांच्या अनेक चित्रपटांमधील नायक हा एका गरीब कामगाराचा मुलगा किंवा शिक्षकाचा मुलगा असायचा आणि हा नायक डाकू, श्रीमंत जमीनदार अथवा कामगारांचे शोषण करणारे गिरणी मालकांच्या अन्यायाविरोधात आवाज उठवायचा. जावेद यांनी लिहिलेल्या विश्वातला नायक भ्रष्ट पोलिस अधिकारी, नेत्यांविरोधात लढा द्यायचा.”
आणखी वाचा- “याच्यामुळे माझे चित्रपट चालत नाही कारण…” अक्षय कुमारचा कपिल शर्मावर आरोप
“आत्ताच्या चित्रपटांमध्ये भ्रष्ट नेते, पोलिस अधिकाऱ्यांना खलनायकाच्या भूमिकेत दाखवले जात नाही. देशासमोर काहीच अडचणी नसल्याचे भासवले जाते. आजकाल तयार होणाऱ्या चित्रपटांमध्ये अनावश्यक गोष्टींचा भडीमार असतो. अशा काही मुद्द्यांमुळे बॉलिवूडची ही अवस्था झाली आहे.” असं म्हणत त्यांनी बॉलिवूडमधील अन्य दिग्दर्शकांवर टिका केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ब्रह्मास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी यांना ‘ब्रह्मास्त्र’ हा शब्द तरी नीट उच्चारता येतो का? असे म्हणत टोला लगावला होता.