दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे हे गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत. बॉयकॉटच्या मुद्द्यावरून ते बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधत असतानाच ‘काश्मीर फाईल्स’ या त्यांचा चित्रपटही ऑस्करच्या मुद्द्यावरून चर्चेत आला होता. २०२२ मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आहे. १९९०मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट हिट ठरल्यानंतर आता ते एक वेब सिरीज आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा : मिलिंद सोमणने खरेदी केले नवे आलिशान घर, उच्चभ्रू वस्तीत असलेल्या या घराची किंमत माहितेय का?
गेल्या काही दिवसांत विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूडमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांवर टिका केली. आपल्या चित्रपटाचं साधं कुणीही कौतूक केलं नाही, असा आक्षेपही त्यांनी केला होता. त्यांचा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत असल्याची बातमी व्हायरल होताच त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने अग्निहोत्री यांच्यावर टीका करुन ‘काश्मिर फाईल्स’च्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
आता काही महिन्यांपूर्वीच ‘द काश्मीर फाईल्स’नंतर त्यांनी ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा केली. अशातच एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. त्या ट्वीटमध्ये ते आता एक वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
हेही वाचा : “हे साफ खोटं आहे की…” विवेक अग्निहोत्रींनी समोर आणलं बॉलिवूडकरांचं सत्य
दरम्यान, या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप केलं गेलेला नाही. पण विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. ही वेब सिरीज ‘काश्मीर फाईल्स’वरतीच आधारित असल्याचे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पण या वेब सिरीजचा नक्की विषय कोणता, यात कोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.