‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपल्या चित्रपटामुळे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. अग्निहोत्री यांनी नुकतंच एका मुलाखतीत बोलताना आपण अभिनेता वरुण धवनचे ऋणी असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी वरुण धवनचं खूप कौतुकही केलं आणि त्याच्याबद्दल बोलताना विवेक भावूकही झाले.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, विवेक म्हणाले की, एकेकाळी त्यांना खूप कठीण काळाचा सामना करावा लागला. त्या संकटकाळात त्यांची मदत कोणीही केली नाही. फक्त वरूण धवन त्यांच्या मदतीला धावून आला. अग्निहोत्री म्हणाले, माझं वरूणवर प्रेम आहे. मी वरुणचा ऋणी आहे. मी हे सगळं कॅमेऱ्यासमोर नाही सांगू शकत. ही आमच्या दोघांमधली बाब आहे. जेव्हा जगात कोणीही माझी मदत करत नव्हतं, तेव्हा वरुणने गुपचूप माझी मदत केली होती. तो खूप चांगला माणूस आहे. मला स्टारडम आणि इतर गोष्टींबद्दल माहिती नाही. पण मी प्रार्थना करतो की तो कायम आनंदी राहावा आणि त्याला भरपूर यश मिळो.
विवेक पुढे म्हणाले,”तो खूप चांगला मुलगा आहे. मला तो आवडतो. मला त्याच्यासोबत काम करायचंय यासाठी मी हे म्हणत नाहीये. माझे डोळे भरुन येतायत. जेव्हा मी मदतीच्या सगळ्या आशा सोडल्या होत्या, त्यावेळी वरुणने माझी मदत केली होती. मी कधी विचारही केला नव्हता की त्याच्यासारखं कोणी माझी मदत करेल.”
विवेक अग्निहोत्री यांनी २००५ साली आपल्या दिग्दर्शनाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. चॉकलेट हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. ते आपल्या सुरूवातीच्या काळामध्ये जाहिरात कंपन्यांसोबत काम करत होते. त्यानंतर त्यांनी जिलेट आणि कोका-कोला सारख्या कंपन्यांसोबत क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केलं. १९९४ साली विवेक टीव्ही मालिकांच्या माध्यमातून या इंडस्ट्रीमध्ये आले आणि त्यानंतर ते दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्राकडे वळले.