‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सध्या बॉलिवूडचा बुरखा फाडण्याचं काम करत आहेत. ते सोशल मीडियावर रोज एखादा मुद्दा घेऊन बॉलिवूडवर टिका करत आहेत. नुकतंच त्यांनी आमिर खानवर जहरी टीका केली आणि आता त्यांच्या रडारवर बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप आहे. नुकतंच त्यांनी अनुराग संदर्भात एक बातमी ट्विट करून बॉलिवूडचा छुपा अजेंडा उघड केला आहे.

काहीच दिवसांपूर्वी अनुराग कश्यपच्या मुलाखतीची एक व्हिडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये अनुरागने RRR चित्रपटाचं खूप कौतुक केलं आहे. अनुरागच्या मते यावर्षी जर भारताकडून अधिकृत प्रवेश म्हणून जर RRR या चित्रपटाला पाठवलं तर त्याला ९९% नामांकन मिळू शकतं. शिवाय ज्यापद्धतीने भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाहिलं आहे त्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या दृष्टीकोनातून परदेशी लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे असं अनुरागचं मत आहे. त्याच्या या वक्तव्यावरच सध्या दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भडकले आहेत.

विवेक अग्निहोत्री यांनी एका बातमीचा स्क्रीनशॉट घेत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात की “ज्या लोकांनी काश्मीरी पंडितांचा नरसंहार नाकारला ती लोकं आता RRR ऑस्करला जावा यासाठी प्रचार करत आहेत.” यामध्ये त्यांनी अनुरागच्या आगामी चित्रपट ‘दोबारा’चाही उल्लेख केला आहे.

विवेक अग्निहोत्री हे सध्या बॉलिवूडच्या विरोधात मोहीम चालवल्यासारखे ट्विट करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट अपेक्षेपेक्षा जास्त चालला आणि प्रेक्षकांनीही तो चित्रपट डोक्यावर घेतला. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना तो चित्रपट ऑस्करला जावा असं वाटत असल्याचं म्हंटलं जात आहे. म्हणूनच त्यांनी अनुरागची वक्तव्यावर टीका केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

आणखीन वाचा : ‘जोपर्यंत हे किंग, बादशाह आणि सुलतान…’, विवेक अग्निहोत्रीने बॉलिवूडच्या Khans वर अप्रत्यक्ष टीका

Story img Loader