बॉलिवूडचे दिग्गज निर्माते विवेक अग्निहोत्री देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या रहस्यमयी मृत्यूवर चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. लाल बहादूर शास्त्री यांच्या ५१ व्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अग्निहोत्री यांनी ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाविषयी माहिती दिली. आगामी चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्री यांना समर्पित करणार असल्याचे ते म्हणाले. आगामी चित्रपटाला कोणते नाव द्यावे, यासंदर्भात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी चित्रपट चाहत्यांना केले आहे.

११ जानेवारी १९६६ मध्ये माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे परदेशात निधन झाले होते. १९६५ सालच्या युद्धात मानहानीकारक पराभव करून पाकिस्तानच्या साहसवादाला शास्त्रीजींनी सडेतोड उत्तर दिले होते. ताश्कंद करारावर सही करून शास्त्रीजींनी साऱ्या जगाला शांततेचा संदेश दिला. या कराराची शाई वाळते न वाळते तोच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. भारताचे तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण, परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग हेही त्या वेळी तिथे उपस्थित होते. नंतर शास्त्रीजींच्या मृत्यूच्या कारणाबाबत शंका, कुशंका व्यक्त करण्यात आल्या आणि आज अर्धशतकानंतरही त्यात खंड पडलेला नाही.

स्मरण : आगळावेगळा नेता

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फ्रिडम’ चित्रपटामध्ये एक राजकीय थ्रिलर पाहायला मिळाले होता. १९८४ ते २००० सालापर्यंतच्या वेगवेगळ्या काळावर त्यांनी या चित्रपटातून प्रकाश टाकल्याचे दिसले होते. देशातील प्रतिभावान, बुद्धिवान आणि सक्षम तरूणांमध्ये उदारीकरणानंतर झालेले बदल या चित्रपटात दर्शविण्यात आले होते. त्यामुळे शास्त्रींना समर्पित करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या चित्रपटाची ते कशी मांडणी करणार यांची नक्कीच उत्सुकता असेल.