दिग्दर्शक विकेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले.या चित्रपटाने ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय अत्याचार हा प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला होता. या चित्रपटाला जगभरातून मोठ्या प्रमाणात संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. अनेकांनी या चित्रपटाचे आणि विवेक अग्निहोत्रींचे कौतुक केले. पण एकही बॉलिवूड कलाकार या चित्रपटाविषयी फारसा बोलला नाही. बॉलिवूडमधील कोणीही या चित्रपटाचे कौतुक केले नाही. त्यामुळे सुरवातीपासूनच बॉलीवुड आणि विकेक अग्निहोत्री यांच्यामध्ये दरी निर्माण झालेली पाहायला मिळाली. तर गेले काही दिवस विवेक अग्निहोत्री बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. तर नुकतेच ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड योग्यच असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा : सोशल मीडियावर सुरु आहे ‘ब्रह्मास्त्र’च्या मीम्सचा पाऊस, फोटो बघून तुम्हालाही अनावर होईल हसू
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तर विवेक यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “हा मुद्दा थोडा किचकट आहे पण हा एक अतिशय चांगला ट्रेंड आहे. यातून प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त करत असून, प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे हे समोर येत आहे. शेवटी या ट्रेंडचा परिणाम खूप सकारात्मक असणार आहे. हे बॉलिवूडविरुद्धचे सांस्कृतिक बंड आहे. मात्र, माझा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. सध्या प्रचलित असलेले फॉर्म्युले वापरुन बॉलिवूडमध्ये जसे चित्रपट बनवले जातात, त्यातून बाहेर पडून वेगळे हिंदी चित्रपट बनवण्याचा माझा प्रयत्न असतो.”
‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा आतापर्यंत अनेक चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व प्रकारांमुळे बॉलिवूड चिंतेत असतानाच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री मात्र या ट्रेंडचे समर्थन करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : ‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा, ‘या’ विषयावर आणणार वेब सिरीज
दरम्यान, ‘ताश्कंत फाईल्स’, ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणावर हा चित्रपट आधारित असेल.