गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र गुरुवारी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यावर अखेर पडदा पडला. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक सेलिब्रेटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी केलेलं ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना समर्थन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करताना लिहिलं, ‘एकनाथ शिंदे तुम्हाला शुभेच्छा आणि एका डानयनामिक लीडरशिपसाठी देवेंद्र फडणवीस यांनाही शुभेच्छा. अखेर आता आम्ही न घाबरता जगू शकणार आहोत. जय महाराष्ट्र!’
आणखी वाचा- फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली पोस्ट, म्हणाल्या…
विवेक अग्निहोत्री यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याशिवाय अभिनेत्री कंगना रणौतनं देखील तिच्या इन्स्टाग्रामवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. “यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे…, ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती होण्यापर्यंत… अभिनंदन सर” असे तिनं म्हटलं आहे.
आणखी वाचा- कंगना रणौतकडून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर अभिनंदन, म्हणाली “रिक्षा चालवण्यापासून ते…”
दरम्यान ही पहिलीच वेळ नाही की कंगना रणौत आणि विवेक अग्निहोत्री यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हे दोघंही नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडताना दिसतात. अंतिम टप्प्यात भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. गुरुवारी संध्याकाळी राजभवनात हा शपथविधी पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट झाल्याचे बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सर्व सामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.