गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे ‘ऑस्कर’ हा विषय खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर या पुरस्कार सोहळ्याशी निगडीत ट्रेंड सुरु आहेत. ऑस्कर हा सिनेजगतातला मानाचा पुरस्कार आहे. दरवर्षी भारताकडून एक चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जातो. ऑस्कर २०२२ मध्ये विनोदराज पीएस यांचा ‘कूझंगल’ (पेबल्स) हा चित्रपट पाठवण्यात आला होता. यावर्षी ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘आरआरआर’ या दोन चित्रपटांपैकी एक चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी पाठवला जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट खूप गाजला. प्रदर्शनाच्या आधीच कथानकाच्या विषयावरुन चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधले होते. काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. चित्रपटातील कलाकारांच्या कामाचेही खूप कौतुक झाले. दरम्यान चित्रपटाच्या सादरीकरणावरुन हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला जाऊ शकतो अशा चर्चा रंगायला लागल्या. त्यातच सोशल मीडियावर चित्रपटाच्या चाहत्यांनी हा चित्रपट ऑस्करमध्ये अधिकृतरित्या पाठवला जावा यासाठी मागणी व्हायला सुरुवात केली.

‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने ऑस्करच्या नामांकनाच्या शर्यतीत बाजी मारली. विवेक यांनी या संदर्भामध्ये एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी “ऑस्करच्या अधिकृत प्रवेशासाठी निवड झाल्याबद्दल ‘छेल्लो शो’ (द लास्ट शो) चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. ऑस्कर २०२३ मध्ये त्यांना यश मिळो ही सदिच्छा. द काश्मीर फाईल्सला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्व हितचिंतकांचे आणि विशेषत: मीडियाचे आभार मानतो”, असे म्हटले आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये विवेक अग्निहोत्रींना ऑस्कर पुरस्काराबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी “माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीही ऑस्करची अपेक्षा केली नव्हती. ऑस्कर हा चित्रपटाची गुणवत्ता ठरवण्याचा निकष असू शकत नाही असे मला वाटते” अशा प्रकारचे वक्तव्य केले होते.

आणखी वाचा – Raju Srivastava Passes Away : स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

१९५७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मदर इंडिया’ हा भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेलेला पहिला चित्रपट आहे.

Story img Loader