देशभरात सध्या केवळ राम मंदिराचीच चर्चा आहे. अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने या दिवशी मंदिरात भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या तिघांना सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. यांच्यासह अनेक मोठे नेते, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० लोकांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
क्रिकेटपटू विराट कोहलीपासून ते बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एका बाजूला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नाही म्हणून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राम जन्मभूमी ट्रस्ट आणि भाजपा सरकारवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या बाजूला, हिंदी चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना निमंत्रण पाठवलेलं असूनही ते या सोहळ्याला जाणार नाहीत. अग्निहोत्री यांनी स्वतः समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती दिली. तसेच याबाबत दुःख व्यक्त केलं.
विवेक अग्नहोत्री यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर राम जन्मभूमी ट्रस्टने पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, निमंत्रणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने अनेकवेळा पाठपुरावा केला. हे पाहून मला सुखद धक्का बसला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील त्या महिलेने मला प्रवासाचा तपशील विचारला. सर्वांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय, त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. काही अपरिहार्य कारणास्तव मी २२ जानेवारी रोजी भारतात नसेन. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मी उपस्थित राहू शकणार नाही. हे खूप दुर्दैवी आहे. तिथे जाता येत नसल्यामुळे मी किती दुःखी आहे हे फक्त मला आणि माझ्या रामालाच माहिती आहे.
हे ही वाचा >> Ram Mandir : “मुसलमानांच्या हत्येनंतर…”, प्राणप्रतिष्ठेआधी जैश-ए-मोहम्मदची भारताला धमकी; म्हणाले, “मंदिराची अवस्था…”
“राम मंदिरासाठी वाट पाहणाऱ्या हिंदूंना शांततेचं नोबेल मिळालं पाहिजे”; मनोज मुंतशिर यांचं वक्तव्य
लेखक लेखक मनोज मुंतशिर यांनी अलीकडेच राम मंदिराबाबत एक वक्तव्य केलं आहे. मुंतशिर यांनी म्हटलं आहे की, जे वकील रामनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी सुट्टी घेत होते त्यांना श्रीरामाच्या अस्तित्वाचा पुरावा हवा होता. हिंदूंना तब्बल ५०० वर्षे आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा लागला. त्यासाठी रक्ताचे पाट वाहिले नाहीत. मी तुम्हाला हे कसं सांगू की हिंदू किती सहिष्णू आहेत. जर जागतिक शांततेचं नोबेल कुणाला द्यायचं असेल तर ते एका व्यक्तीला नाही तर १०० कोटी भारतीयांना दिलं गेलं पाहिजे. राम मंदिराचं आंदोलन शांततेत झालं. त्यासाठी हिंदूंना नोबेल दिलं पाहिजे.