नाटककार महेश एलकुंचवार यांनी पन्नासेक वर्षांपूर्वी सरंजामशाहीचं प्रतीक असलेल्या ‘वाडा संस्कृती’च्या पतनाचं तसंच स्वातंत्र्योत्तर काळातील बदलत्या सामाजिक-आर्थिक पर्यावरणामुळे वेगानं विघटनाकडे निघालेल्या कुटुंबसंस्थेचं वास्तवदर्शी चित्रण करण्यासाठी ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक लिहिलेलं असलं, तरी त्याचं नाव मात्र त्यांनी ‘वाडा चिरेबंदी’ असं का ठेवावं, कळायला मार्ग नाही. खरं तर या नाटकात वाडय़ाचे आणि वाडा संस्कृतीचे चिरे ढासळताना दाखवले आहेत. कोणत्याही क्षणी हा वाडा त्यातल्या माणसांच्या ताणलेल्या नातेसंबंधांसह जमीनदोस्त होण्याची भीती पडछायेसारखी नाटकभर व्यापून राहिली आहे. तसं स्पष्ट सूचन एलकुंचवारांनी केलेलं आहे. तरीही या वस्तुस्थितीशी पूर्ण विसंगत असं नाव नाटकाला देण्यामागे काय कारण असावं बरं? असो. या प्रश्नाचं उत्तर एलकुंचवार कधीतरी देतीलच.
..तर हे ‘वाडा चिरेबंदी’ एलकुंचवारांच्या पंच्याहत्तरीचं निमित्त साधून पुनश्च रंगभूमीवर आलं आहे. सलग आठ तासांची ‘वाडा’ नाटय़त्रयी सादर करणाऱ्या चंद्रकांत कुलकर्णी यांनीच ते दिग्दर्शित केलेलं आहे. अभिजात नाटकांचं पुन:पुन्हा मंचन होणं हे नव्या पिढीला गतेतिहासाशी परिचित करून देण्याकरता आवश्यक असतं. हा हेतू यामुळे पूर्ण होतोच; शिवाय उत्तम वास्तववादी नाटकाचा वानवळाही यानिमित्ते प्रेक्षकांच्या नव्या पिढीसमोर ठेवला गेला आहे.
कधीकाळी विदर्भातले बडे जमीनदार असलेल्या धरणगावकर देशपांडय़ांचं ते वैभव बदलत्या काळाबरोबर लयास गेलं आहे अशा कालखंडात हे नाटक घडतं. जमीनदार. त्यात देशस्थ ब्राह्मण. त्यामुळे जन्मजात मिजासी वृत्ती अंगी बाणलेली. कष्टांची सवय नाही. हुकूम सोडणं तेवढं माहीत. परंतु कालौघात काप गेले अन् भोकं उरली तरी ताठा कमी झालेला नाही. वाडय़ासमोर पडीक ट्रॅक्टर पांढऱ्या हत्तीगत फुकाचा पोसलेला. तोही आता गंज चढून धारातीर्थी पडण्याच्या अवस्थेत.  अशा धरणगावकर देशपांडय़ांच्या घरातले कर्ते पुरुष तात्याजी वृद्धापकाळानं मरण पावलेत. मुंबईला असलेला मधला मुलगा सुधीर वगळता देशपांडे कुटुंब गावातच वास्तव्य करून असलेलं. सुधीरला कळवूनही तो अंत्यसंस्कारावेळी पोहोचू शकला नव्हता. आता दिवसकार्यासाठी सुधीरची वाट बघणं सुरू आहे.
सुधीर बायको अंजलीसह गावी पोहोचतो तेव्हा चार दिवस उलटून गेलेत. तात्यांच्या जाण्यानं घरावर सुतकी कळा असली तरी आईशिवाय इतरांना फारसं दु:ख झालेलं नाही. तात्यांच्या हयातीत घरातल्या कुणाचंच त्यांच्यापुढे चालत नसे. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं सर्वानी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडलेला. प्रत्येकजण आता आपल्याला हवं ते करायला मोकळा झालेला. अशात सुधीर-अंजली तिथं पोहोचल्यावर साहजिकच पुढची इस्टेटीची निरवानिरव लावली जावी अशी प्रत्येकास आस लागून राहिलेली. शिक्षणासाठी आसुसलेली, पण तात्याजींच्या जमीनदारांच्या तथाकथित इभ्रतीपायी कॉलेजशिक्षण घेऊ न शिकलेली आणि मनाजोगता मुलगा सांगून न आल्यामुळे लग्नाविना राहिलेली प्रभा आपल्या वाटय़ाला येणारे दागिने विकून पुढचं शिक्षण करू इच्छितेय. तर घरात खालमानेनं घरगडय़ासारखा राबणारा धाकटा चंदू गावात दुकान टाकावं म्हणतोय. (आईकडे त्यानं तशी इच्छा व्यक्त केलीय. बाकी कुणाकडे बोलायची त्याची शामत नाही.) आता घराची सूत्रं हाती आलेल्या थोरल्या भास्करला आपलं आयुष्य गावात वाया गेलं असं वाटतंय. त्यामुळे घरचा सगळा जमीनजुमला आणि पिढीजात दागदागिने आपल्याच पदरी पडावेत अशी त्याची मनिषा आहे. मात्र, सुधीरला आपला वाटा हवा आहे. वडिलांचं श्राद्ध जमीनदारांच्या इभ्रतीला साजेसं व्हायला हवं असं भास्करचं म्हणणं. पण वाण्याची उधारी थकल्यामुळे तो आणखी उधार द्यायला तयार नाही. त्यानं वाडय़ाचा मागचा भाग विकत मागितलाय. (जो आईच्या वाटय़ाचा आहे!) तो विकून येणाऱ्या पैशांत श्राद्धविधी उरकायची तजवीज भास्करनं आधीच करून ठेवलीय. सुधीरला ते मान्य नाहीए. परंतु आपल्या खिशातून दमडी काढायला तोही राजी नाही. शेवटी आईच आपला भाग विका म्हणून सांगते आणि घरातली भांडणं चव्हाटय़ावर आणायचं टाळते..
वयोमानपरत्वे डोळे आणि कान गेलेली तात्याजींची आई- दादी अंथरूणाला खिळून आहे. तात्याजी गेलेले तिच्या गावीही नाही. ती सतत त्यांच्या नावानं हाका मारत असते. नवरा गेल्यानं परस्वाधीन झालेल्या आईला काळजी आहे ती चंदू आणि प्रभाची. त्यांचं कसं होणार, या चिंतेनं तिचं काळीज तीळतीळ तुटतंय. त्यात भास्करचा मुलगा पराग शिक्षण अर्धवट सोडून गावात उंडारक्या करत फिरतोय. तो दारूच्या आहारी गेलाय. भास्करची वयात आलेली मुलगी रंजू हिंदी सिनेमानं नादावलीय. तिच्या मॅट्रिकच्या वाऱ्या सुरू आहेत. त्यातून पार होण्यासाठी गावातल्या एका तरुण मास्तरची शिकवणी तिला लावलीय. पण तिची वेगळीच थेरं सुरू आहेत. भास्करची बायको- म्हणजे घरातली थोरली सून ‘आता घरावर आपलंच राज्य’ आल्याच्या तोऱ्यात वावरतेय. सुधीरची बायको अंजली ही कोकणस्थ असल्यानं देशस्थांच्या या घरात तिला गुदमरल्यासारखं होतं. तिच्या कोकणस्थपणावर जो-तो येता जाता टोमणे देत असतो.
तात्याजींच्या कार्याच्या निमित्तानं एकत्र आलेल्या या सर्वाच्या आपापसातील  गुंतागुंतीच्या, ताणलेल्या संबंधांचं सूक्ष्म, तरल चित्र एलकुंचवारांनी ‘वाडा’मध्ये रंगवलं आहे. अनेक पातळ्यांवर त्यांनी हे नाटक खेळवलेलं आहे. वाडय़ाबाहेरचं सामाजिक-आर्थिक पर्यावरणही या ना त्या मार्गानं नाटकात सूचकपणे येत राहतं आणि एक समग्र जीवनानुभव त्यातून उभा ठाकतो.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वैदर्भीय जमीनदार कुटुंबातील अंतर्गत ताणतणावांसह तत्कालीन भवताल त्याच्या रंग, रूप, रस आणि गंधासह प्रयोगात समूर्त केला आहे. यातले फॅन्टसीसदृश्य प्रसंग त्यांनी तरलतेनं हाताळले आहेत. यातली पात्रं खरं तर दुष्ट नाहीयेत. त्यांच्यातले ताणतणाव हे मानवी स्वभावातील खाचाखोचा, संस्कारांतून आलेली मानसिकता, रीतीरिवाज व परंपरांचे ओझे तसंच परिस्थितीच्या रेटय़ातून निर्माण झालेले आहेत. या सगळ्याला नाटकात निसर्गाचं उत्कट नेपथ्य लाभलेलं आहे. रातकिडय़ांची किरकिर, कुत्र्यांचं भुंकणं, ढगांचा गडगडाट, मोटारीचा आवाज, कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात माणसांच्या गडद होत जाणाऱ्या सावल्या.. असं सर्वागानं नाटक दृक्-श्राव्य-काव्य रूपात चंद्रकांत कुलकर्णी यांनी उभं केलं आहे. पात्रांच्या बोलीवर तर त्यांनी कसून मेहनत घेतल्याचं जाणवतं. विशेष म्हणजे नागर नट मंडळींना वैदर्भीय बोलीचा लहेजा आणि ठसका आत्मसात करायला लावणं सोपं नाही. यातल्या नटांच्या प्रचलित इमेजला छेद देण्याचं आव्हानही त्यांनी ‘वाडा’मध्ये मोठय़ा हिमतीनं पेललं आहे. नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी साकारलेला यातला वाडा हे या नाटकाचं अभिन्न अंगच आहे. आनंद मोडक यांचं संगीत नाटय़ांतर्गत मूड गहिरं करतं. रवि-रसिक यांच्या विचारी प्रकाशयोजनेतून वाडय़ाचा सबंध भवताल दृश्यमान झालेला आहे. परिस्थितीनं पोकळ झालेल्या जमीनदार देशपांडय़ांच्या कुटुंबातील माणसांचे पेहेराव प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी यथार्थपणे केले आहेत. मुंबईकर सुधीर-अंजलीचे कपडे त्यावेगळे आहेत. किशोर िपगळे यांच्या रंगभूषेतील अस्सलतेनं ‘वाडा’तली पात्रं बाह्य़ांगी जिवंत झाली आहेत.
वैभव मांगले यांनी विनोदी नटाच्या आपल्या इमेजबाहेर येण्याचं धाडस यात प्रथमच केलेलं आहे. भास्करचं सरंजामशाही वागणं-बोलणं, घरातल्या कर्त्यां पुरुषाची हुकूमशाही अशा काही जोशात त्यांनी वठवली आहे, की पूछो मत! त्यांच्या कारकीर्दीतील ही एक अविस्मरणीय भूमिका ठरावी. निवेदिता सराफ यांनी वहिनीचं मोकळेढाकळेपण अस्सल वऱ्हाडी बोलीसह मस्त पेललं आहे. शहरी संस्कार व अंगभूत देशस्थी वृत्ती यांचं कॉम्बिनेशन असलेला सुधीर- प्रसाद ओक यांनी उत्तम रंगविला आहे. पौर्णिमा मनोहरांनी अंजलीचा टिपिकल कोकणस्थीपणा छान दाखवला आहे. उच्छृंखल रंजूच्या भूमिकेत नेहा जोशी फिट्ट बसल्यात. सिद्धेश्वर झाडबुके यांनी ‘गरीब बिच्चारा’ चंदू साक्षात् साकारला आहे. प्रभाची तगमग, बंडखोरी आणि तिचा तळतळाट प्रतिमा जोशी यांनी सर्वार्थानं दाखविला आहे. भारती पाटील यांनी सोशिक आई जेश्चर-पोश्चरसह यथार्थ उभी केली आहे. अजिंक्य ननावरेंनी परागचा घुमेपणा, व्यसनाधीनतेतून आलेला अपराधगंड तसंच सुधीरसोबतचं निखळ वागणं या सगळ्या भावच्छटा सुंदर दाखवल्यात. विनिता शिंदेंची दादीही लक्षवेधी.
एलकुंचवारांचा हा चिरेबंदी (?) नाटय़‘वाडा’ गतरम्यतेसह एक उत्कट, समृद्ध जीवनानुभव देतो यात शंकाच नाही.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील रविवारच्या ‘नाटय़रंग’ सदरात ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या अशोक हांडे यांच्या रंगाविष्काराबद्दल लिहिताना अनवधानाने ‘कऱ्हेचे पाणी’चे पुढील खंड अत्र्यांच्या कन्या शिरीष पै यांनी केल्याचे म्हटले होते. परंतु हे खंड त्यांच्या दुसऱ्या कन्या मीना देशपांडे यांनी संपादित केलेले आहेत.

मागील रविवारच्या ‘नाटय़रंग’ सदरात ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या अशोक हांडे यांच्या रंगाविष्काराबद्दल लिहिताना अनवधानाने ‘कऱ्हेचे पाणी’चे पुढील खंड अत्र्यांच्या कन्या शिरीष पै यांनी केल्याचे म्हटले होते. परंतु हे खंड त्यांच्या दुसऱ्या कन्या मीना देशपांडे यांनी संपादित केलेले आहेत.