जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी चित्रपटातून काम करावेसे वाटत नसल्याचे सांगत चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब, बिबी और गुलाम’, ‘चौदवी का चांद’, ‘गाईड’, ‘तिसरी कसम’, ‘खामोशी’सारख्या अनेक चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या ७६ वर्षीय वहिदा रेहमान या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुंदर आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गणल्या जातात.
काल रात्री मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वहिदा रेहमान म्हणाल्या, मला आता काम करायची इच्छा नाही. मला चित्रपटसृष्टीचा निरोप घ्यायचा आहे. अन्य कलाकार असताना किती वर्ष अभिनय करत राहायचं. कोणत्या निर्मात्याला माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे, हे मला माहिती नाही. आई आणि आजीची भूमिका साकारली असून, आता अभिनय करण्यासारखे काही राहिले नाही.
कमल हसनच्या ‘विश्वरुपम-२’ या आगामी चित्रपटात त्या दिसणार आहेत. हा चित्रपट तामिळ आणि हिंदी भाषेत बनविण्यात येणार असून, २०१३ साली आलेल्या कमल हसनच्या ‘विश्वरुपम’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या विषयी बोलताना त्या म्हणाल्या, या चित्रपटात अतिशय छोटीशी अशी पाहुण्या कलाकाराची भूमिका मी साकारत आहे. याचे चित्रीकरण झाले असून, कमल हसनबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. तो अतिशय उत्कृष्ट आणि हुशार माणूस आहे. हा चित्रपट हिंदी आणि तामिळ भाषेत बनत असून, मी तामिळ संवाददेखील म्हटले आहेत. अभिनयाव्यतिरिक्त आपण कशात व्यस्त असता या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, मी खूप प्रवास करते, वाचन करते, मित्रपरिवाराला भेटते आणि क्वचित प्रसंगी खाद्यपदार्थ बनवते. १९५० पासून चित्रपटसृष्टीचा भाग असलेल्या वहिदा रेहमान आजही काही निवडक चित्रपटांमधून काम करतात. राकेश ओमप्रकाश मेहरांच्या ‘दिल्ली ६’ या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. चित्रपटसृष्टीच्या सद्यस्थितीवर बोलताना त्या म्हणाल्या, आज चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले आहेत. हल्लीचे चित्रपट अधिक धाडसी आणि वेगळ्या प्रकारच्या विषयांवर बनत आहेत. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनाने चित्रपटक्षेत्रात कमालीची प्रगती झाली आहे… जी एक चांगली बाब आहे.
अभिनेत्री वहिदा रेहमान यांचा चित्रपटसृष्टीला रामराम?
जेष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनी चित्रपटातून काम करावेसे वाटत नसल्याचे सांगत चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत.
First published on: 07-04-2014 at 05:11 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waheeda rehman to quit film industry