ब्रायन क्रॅन्स्टन या अभिनेत्याला साठोत्तरीत हॉलीवूडच्या मुख्य धारेत स्थान मिळाले. कैक वर्षांनी त्याचे हॉलीवूडमधील स्ट्रगलिंगचे दिवस एकाएकी ‘ब्रेकिंग बॅड’ नावाच्या टीव्ही मालिकेमुळे पालटले. त्यानंतर डझनांहून अधिक मुख्य धारेतील आणि कलात्मक चित्रपट करूनदेखील त्याला ‘ब्रेकिंग बॅड’च्या तुलनेमध्ये यश मिळाले नाही. म्हणजे त्याच्या अभिनयात कणभरही फरक पडला नसला, तरी मिळणाऱ्या पटकथेतील (ट्रम्बो वगळता) व्यक्तिरेखांचा वकूब बेतास बात होता. व्यक्तिरेखेत शिरून अभिनयाचे शॅमेलिऑनी रंग दाखविणाऱ्या या कलाकाराचा ‘वेकफिल्ड’ मात्र त्याच्या अभिनय क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेणारा आहे. ‘वेकफिल्ड’ या चित्रपटाला आधार आहे ई.एल. डॉक्ट्रोव्ह यांच्या त्याच नावाच्या ‘न्यूयॉर्कर’ साप्ताहिकामध्ये छापून आलेल्या लांबलचक कथेचा. दिग्दर्शिका रॉबिन स्वायकॉर्ड या स्वत: पटकथाकार आहेत आणि पूर्णपणे साहित्य संकल्पनांवर आधारलेला ‘जेन ऑस्टिन बुक क्लब’ त्यांनीच दिग्दर्शित केला होता. त्याशिवाय मटिल्डा, क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन या कथासाहित्यातील लोकप्रिय कलाकृतींच्या पटकथेतही त्यांचा सहभाग होता. साहित्यावरील कमालीच्या आस्थेपोटी त्यांनी ‘वेकफिल्ड’ या कथेचा आपल्या चित्रपटासाठी उपयोग करून घेतलेला दिसतो. क्रॅन्स्टन आणि स्वायकॉर्ड यांनी मिळून उभा केलेला वेकफिल्ड जाणीवपूर्वक वैराग्य आलेल्या माणसाची गोष्ट सांगतो. तो मानवी कुटुंबसंस्थेची, नात्याची गरज विशद करतो, त्याचबरोबर रहस्यपटासारखा प्रेक्षकांच्या डोक्याला भरपूर चालनाही देतो. चित्रपटाला सुरुवात होते तीच ऑफिसातून घरी परतण्यासाठी निघालेल्या मध्यमवयीन हॉवर्ड वेकफिल्डच्या (क्रॅन्स्टन) ट्रेन प्रवासापासून. सर्व काही सुरळीत असताना रोज रोज सारखाच दिवस, कालचीच गाडी, कालचाच ट्रेनचा डबा आणि कालचेच जगणे, अशा सरधोपट आयुष्याला कंटाळून वैराग्य स्थितीत जाण्याची ओढ हॉवर्डला लागलेली असते. न्यूयॉर्कपासून दूरच्या उपनगरामध्ये राहणाऱ्या या वेकफिल्डची ट्रेन बिघडते आणि त्याच्याजवळ उशिरा घरी पोहोचण्यावाचून गत्यंतर नसते. तो घराच्या दिशेने परततो आणि गॅरेजच्या माळ्यावर जातो. तिथल्या अडगळीतून तो आपल्या घरातील दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यात कल्पना चमकून जाते ती घरी न परतण्याची. गॅरेजच्या त्या माळ्यावरून आपली कुटुंबातील अनुपस्थिती तो अनुभवायला लागतो. यात पत्नीसोबतच्या पंधरा वर्षांच्या संसारावरचा राग, लोभ आणि कटुता आदींच्या पातळ्या वेकफिल्ड दाखवायला लागतो. सर्वात पहिल्यांदा त्याला आपल्या पत्नीवरचा संशय गॅरेजच्या इमारतीतून पडताळून पाहायचा असतो. आपण घरात नसताना पत्नीचा थरकाप आणि तिचे दु:ख वेकफिल्ड आनंदाने उपभोगतो; पण कालांतराने आपल्या आत्मकैदेकडे पाहण्याची चांगली दृष्टी त्याला प्राप्त होते. हा चित्रपट घडतो तो नायक वेकफिल्डच्या स्वगतांमधून. ही स्वगते जगभरातील तमाम कुटुंबप्रमुख पुरुषांची स्त्रियांविषयीची, कुटुंबाविषयीची मानसिकता विशद करणारी आहेत. ती टीकात्मक वा एकांगी नाहीत. संपूर्ण चित्रपटभर त्याची ‘घर थकलेली संन्यासी’ अवस्था पाहायला मिळते. यात त्याची पत्नी (जेनिफर गार्नर) किंवा कुटुंब फक्त घरातील काचेतून दिसते. तो अडगळीच्या गॅरेजमाळ्यावर आपले स्वतंत्र विश्व साकारतो. मध्यरात्री शहरातील कचऱ्यात फेकून दिलेले अन्न गोळा करतो आणि या सर्वामध्ये आपल्या कुटुंबावर हेरगिरीचे महत्त्वाचे कामही करतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याने आपल्यावर जगाची नजर किती वाईट प्रमाणात असते, याविषयी भाष्य केलेले आढळते. पुढल्या काही क्षणांपासून त्याच्या बोलण्याशी फारकत घेणारे विरोधाभासी कार्य सुरू झालेले असते. आपल्या जुळ्या मुलींबाबत आणि पत्नीबाबतचे त्याचे टोकाचे प्रेमच त्याला कुटुंबाशी फारकत घ्यायला कारणीभूत ठरते. डॉक्ट्रोव्ह यांच्या कथेशी पूर्णपणे प्रामाणिक असलेल्या या संयत चित्रपटात सर्वात पकडून ठेवणारी गोष्ट आहे ती ब्रायन क्रॅन्स्टनची देहबोली. ‘कास्ट अवे’मधील टॉम हँक्सच्या भूमिकेशी तुलना करता येईल इतका जीव त्याने या भूमिकेत ओतला आहे. चित्रपटाची विभागणी साधारणत: दोन भागांत करता येईल. पहिल्या भागात आजच्या आधुनिक जगातील विवाहसंस्था आणि नातेसंबंधांच्या तकलादूपणावर भाष्य करणारा वेकफिल्ड दिसतो, तर दुसरा भाग त्याची शेजारी राहणाऱ्या दोन गतिमंद मुलांसोबत मैत्री झाल्याने होणाऱ्या बदलांचा आहे. या संयतनाटय़ामध्येही दिग्दर्शिकेने विनोदाचेही काही तुकडे जोडले आहेत. अचानक कुटुंबासमोर गेल्यानंतर त्यांची उडू शकणारी तारांबळ, त्यांची प्रतिक्रिया यांचे काल्पनिक तुकडे क्रॅन्स्टन रचू लागतो. संपूर्ण चित्रपट क्रॅन्स्टनच्या अभिनय कौशल्यावर उभा आहे. ‘ब्रेकिंग बॅड’ ही टीव्ही मालिका अनुभवलेल्यांना या चित्रपटात क्रॅन्स्टनच्या अभिनयाची आतशबाजी पाहायला मिळेल अन् हा अभिनेता माहिती नसलेल्यांना या चित्रपटातील आत्मकैदेची गोष्ट आवडून जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा