मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला भक्ती रसात न्हाऊन निघत आहेत. पंढरपूरची वारी आयुष्यात एकदा तरी अनुभवावी ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. आपल्या एरवीच्या व्यग्र वेळापत्रकातून बाहेर पडून या वारीत सहभागी होण्यासाठी कलाकारही आसुसलेले असतात. कलाकारांच्या वारीविषयीच्या भावना, आठवणी त्यांच्याच शब्दात..

ते सहा तास..

माझी आजी नेहमी सांगायची मनुष्य जन्म मिळूनसुद्धा जर आयुष्यात एकदाही वारी केली नाही तर जन्म व्यर्थ आहे, असंच समजा. आजीच्या या विचारांनी मला कित्येक वर्ष वारीची ओढ लावली होती. या वर्षी ती इच्छा पूर्ण झाली. वाखरी ते पंढरपूर असा सहा तास प्रवास मी पायी केला. वारकऱ्यांना भेटून, त्यांच्याबरोबर चालून, खेळून, नाचून, फुगडय़ा घालून, माऊलीचा जयघोष करत पंढरपूर कधी आलं ते कळलंच नाही. या वर्षी वारीला जाण्याचा योग हा माझ्या टीममुळे आला. आम्ही वारीत वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. त्यांच्या बसण्याची सोय, पाण्याची सोय, पत्राशेड, मदतकक्ष उभारणं अशी बरीच मदत आमच्या टीमने वारीत केली होती. त्याच्या पाहणीसाठी मी पंढरपूरला गेलो होतो. मुंबई ते पंढरपूर हा प्रवाससुद्धा समृद्ध करणारा होता. सरळ एक रेष आखावी अशा स्वरूपात सर्व वारकरी हरिनामाचा गजर करत चालले होते. वाखरी ते पंढरपूपर्यंतच्या प्रवासात मी नेहमीचा स्वप्निल जोशी नव्हतोच. तिथे येणारा प्रत्येक माणूस मग तो बुटका असो, पंगू असो, काळा असो, गोरा असो कोणीही असो. कसलाच भेद नव्हता. प्रत्येक जण एक होता. सगळय़ांचा रंग एक होता. तेव्हा मला खऱ्या अर्थाने अवघा रंग एकचि झाला, या अभंगाची प्रचीती आली. त्या सहा तासांत मी पुढच्या सहा महिन्यांसाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा घेऊन आलो. पायी वारी करताना पायाला सूज येते, पण मनाची, विचारांची सूज कायमची निघून जाते.  

– स्वप्निल जोशी, अभिनेता

कैवल्य वारी

माझा जन्म आळंदीचा. त्यामुळे मला सगळे म्हणतात की, तू आईच्या पोटात असल्यापासून वारी अनुभवते आहेस. आणि हे खरंच आहे. मुळात आळंदीमध्ये वर्षांचे ३६५ दिवस हरिनामाचा गजर सुरू असतो. इथलं वातावरण इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा खूप वेगळं आहे. पण जेव्हा आषाढी आणि कार्तिकी वारीचे दिवस येतात तेव्हा तर इथल्या सकारात्मक स्पंदनात आणखी भर पडते. मला आठवतंय शाळेत असताना प्रस्थानाच्या निमित्ताने आम्हाला शाळेत सुट्टी असायची, कारण शाळेत वारकऱ्यांची निवासाची सोय असायची. घरी बाबांना भेटायला तसेच राहायला वारकरी यायचे. त्यामुळे सकाळच्या काकड भजनापासून झालेली दिवसाची सुरुवात रात्रीच्या शेजारती, भजनाने सांगता व्हायची. हरिनामाच्या अखंड गजरात आमच घर असायचं आणि आजही असतं. बाबांचा दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला कार्यक्रम असतो. माझा भाऊ कौस्तुभ दरवर्षी त्यांच्याबरोबर पंढरपूरला जातो. मला शाळा- कॉलेजमुळे काही जमायचं नाही, पण ते आल्यावर त्यांचे अनुभव ऐकायला मी कायम उत्सुक असायचे व आजही असते. या वर्षी ‘कैवल्य वारी’ या नावाने एक अल्बम प्रकाशित होतो आहे. पालखी मार्गातल्या प्रत्येक गावांवर गाणी रचली असून आपल्या वारीचं वैभव अधोरेखित करण्याचा प्रयत्न आमच्या टीमने केला आहे.

– कार्तिकी गायकवाड, गायिका

यंदाची तिसरी वारी..

यंदाची माझी तिसरी वारी आहे, जी मी खूप जवळून अनुभवतो आहे. गेल्या दोन वर्षांत करोना महामारीमुळे पायी वारी झाली नव्हती. त्याच्या आदल्या वर्षी जी वारी झाली त्या वारीत आणि या वर्षीच्या वारीत खूप फरक जाणवतो आहे. खूप मोठय़ा संख्येने वारकरी या वर्षी वारीत सहभागी झाले आहेत. सळसळता उत्साह प्रत्येक वारकऱ्यात सतत दिसतो आहे. या  वारीमधले अनेक सकारात्मक गुण घेऊन मी घरी परतत असतो. त्यातला एक महत्त्वाचा गुण म्हणजे ‘अतिथी देवो भव’. वारकऱ्यांचं स्वागत ज्याप्रकारे सर्व गावांमध्ये केलं जातं. त्यांची निवासाची, चहापाण्याची, भोजनाची व्यवस्था ज्याप्रकारे प्रत्येक गावामध्ये केली जाते, ते पाहून अचंबित व्हायला होतं. अनेक गावकरी स्वत:च्या घरात वीस-पंचवीस वारकऱ्यांची राहायची व्यवस्था करतात. मोठं घर असेल तर दोनशे वारकरीसुद्धा एकत्र राहिलेले मी पाहिले आहेत. हा एकोपा इथेच पाहायला मिळतो. या वर्षी वारकऱ्यांना पावसाने जागोजागी चिंब भिजवलं. त्या परिस्थितीतसुद्धा हरिनामाचा गजर, भजन, कीर्तन सुरूच होतं. रिंगणाच्या वेळीसुद्धा खूप मोठा पाऊस झाला, पण तत्पर गावकऱ्यांनी लगेच मैदानात माती आणून टाकली व रिंगण सोहळा संपन्न करायला हातभार लावला. वारकऱ्यांमध्ये असणारी आपुलकी, कार्यतत्परता, संतुष्टता हेच गुण मी गेले तीन वर्ष अनुभवतो आहे. आणि याचमुळे वारी कितीही अनुभवली तरी दरवर्षी मला वारीची ओढ लागते.

– संदीप पाठक, अभिनेता.

गेलो दर्शनाला पण..

माझं संपूर्ण बालपण हे पुण्यात गेलं. दरवर्षी तीन दिवस पालख्या पुण्यात असतात. लहानपणापासून पुण्यातले ते तीन दिवस खूप जवळून अनुभवले आहेत. त्या तीन दिवसांत ‘वारकरी भोजन’ ही सेवा पुण्यात खूप मोठय़ा प्रमाणात गल्लोगल्ली बघायला मिळते. वारकरी भोजनाची ही परंपरा आमच्या वाडय़ातसुद्धा होती. त्यामुळे लहानपणी वारकऱ्यांना जेवायला वाढण्याच्या सेवेत मी सहभाग घ्यायचो. आळंदी ते पंढरपूर अशा तीन वाऱ्या मी केल्या. पहिली वारी मी अकरावीत असताना माझ्या आजोबांबरोबर केली. दुसरी महाविद्यालयात पहिल्या वर्षांला असताना केली. तिसऱ्या वारीचा किस्साच मोठा आहे. मुळात मला वारीत सहभाग घेण्याची इच्छा माझ्या संत साहित्याच्या अभ्यासामुळे, वारीच्या अभ्यासामुळे निर्माण झाली होती. महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांत शिकत असताना या वर्षी वारी करायची की नाही ? ही चर्चा मित्रांबरोबर सुरू होती. वारी नाही तर किमान माऊलींच्या रथाचं दर्शन घेऊन येऊ या विचाराने आम्ही आळंदीला गेलो. आता आलोच आहोत तर आळंदी ते पुणे चालू. पुढे पुण्यात पोहोचल्यावर दिवेघाटापर्यंत जाऊ. असं करत करत आम्ही सगळे मित्र कधी पंढरपूरला पोहोचलो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. अंगावरच्या कपडय़ांवर माऊलींच्या रथाचं दर्शन करायला गेलेलो आम्ही पूर्ण वारीच करून आलो. ही वारी लक्षात राहण्यासारखी होती, कारण खिशात काहीही पैसे नसताना वारकऱ्यांसोबत ‘जसे असेल तसे’ या विचारांनी केलेली वारी आयुष्यात खूप काही शिकवून गेली.

– दिग्पाल लांजेकर, दिग्दर्शक

तो एक महिना आनंदाचा..

पंढरपूर पासून ३५ किमी अंतरावर दिघंची हे गाव आहे. याच गावात मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे वारी, दिंडी, वारकऱ्यांचे खेळ खेळत मी मोठा झालो आहे. जशी मुंबईमध्ये गणेशोत्सवाची ओढ असते, तशी आम्हाला गावी वारीची ओढ असायची. आमच्या गावातून मानाच्या पालख्या जात नाहीत, पण इतर सर्व दिंडय़ा आजही जातात. आमच्या शाळेत वारकऱ्यांच्या निवासाची, भोजनाची सोय व्हायची. त्यामुळे वारकऱ्यांना जेवण वाढण्यापासून त्यांच्यासोबत खेळ खेळण्यापर्यंत माझा सहभाग असायचा. त्यातले काही वारकरी बाजारहाट करायला निघायचे, तेव्हा त्यांना आपल्या गावातला बाजार दाखवण्याचं कामसुद्धा मी करायचो. पंढरपूरच्या दिशेने जाणारी वारी आणि तिथून माघारी येणारी परतवारी अशा दोन्ही वाऱ्या गावातून जायच्या, त्यामुळे महिनाभर गावात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम चालायचे. आमच्या घरासमोर विठ्ठल मंदिर असल्याने मी हरिनामाच्या गजरात झोपायचो आणि सकाळी काकड आरतीच्या आवाजात उठायचो. आता चित्रीकरणाच्या निमित्ताने मुंबईला असल्याने तो एक महिन्याचा रम्य काळ अनुभवायला मिळत नाही, याची खंत वाटते. 

– सुमित पुसावळे, अभिनेता