बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला 83 हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंहने यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून त्यासाठी त्याचे कौतुक केले जात आहे. पण या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी रणवीर सिंह नाही तर दिग्दर्शकाने अभिनेता अर्जुन कपूर याला पहिली पसंती दिली होती, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावर स्वत: दिग्दर्शक कबीर खान यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी विश्वचषक जिंकत इतिहास रचला होता. याच विजयगाथेवर ‘83’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. पण रणवीर नव्हे तर अर्जुन कपूर कपिल देव यांची भूमिका साकारणार होता असे बोललं जात आहे. मात्र आता त्यामागचे सत्य समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून 83 चे दिग्दर्शक कबीर खान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतंच कबीर खानने एका कार्यक्रमात अनेक खुलासे केले आहे. यावेळी त्याला अर्जुन कपूर हा या चित्रपटासाठी पहिली पसंती होता का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट नकार दिला. “कपिल देव यांच्या भूमिकेसाठी मी नेहमीच रणवीर सिंह याला पहिली पसंती दिली आहे. तो नेहमीच त्या भूमिकेसाठी माझ्या मनात असायचा,” असे कबीर खान म्हणाले.

…म्हणून कपिल देव यांनी ‘83’ पाहण्यास दिला नकार, दिग्दर्शकाने केला खुलासा

“जेव्हा मला हा चित्रपट बनवण्यास सांगण्यात आले तेव्हा माझ्या मनात फक्त रणवीर होता. तुम्ही रणवीरचे शेवटचे ४ चित्रपट बघा. त्यातील प्रत्येक चित्रपटात तुम्हाला एक वेगळी व्यक्ती दिसेल. रणवीर हा या चित्रपटासाठी एक आदर्श पर्याय हे मला माहीत होते. त्यावेळी मी त्याला सांगितले की ही एकसारखी दिसणारी स्पर्धा नाही. तुला कपिलच्या व्यक्तिमत्त्वानुसार जगावे लागले,” असेही कबीर खानने सांगितले.

यापुढे कबीर खान म्हणाला, “83 हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. जर मी हा चित्रपट योग्यप्रकारे बनवला नाही, तर हा देश मला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे हीच गोष्ट रणवीरला देखील लागू होते. जर त्याने कपिल देवचे पात्र पडद्यावर योग्यरित्या साकारले नाही, तर त्याला प्रेक्षक कधीही माफ करणार नाही.” दरम्यान ‘83’ हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.