खिलाडी म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’ चित्रपटातील ‘आज दिल शायराना’ या प्रेमगीताचा व्हिडिओ चित्रपटकर्त्यांमार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे. चित्रपटात कॅप्टन विराटची भूमिका साकारणारा अक्षय या गाण्यात चित्रपटातील त्याची प्रेयसी सोनाक्षी सिन्हाबरोबर रोमान्स करताना दिसतो. याआधी प्रसिद्ध करण्यात आलेले ‘तु ही तो है’ हे याच चित्रपटातील गाणे धमाल-मस्ती स्वरूपातले होते, तर ‘आज दिल शायराना’ हे गाणे हळुवार प्रेमगीत आहे. सुफी धाटणीतल्या या गाण्यात अक्षयने काही चांगल्या डान्समुव्हज् केल्या आहेत. नयनरम्यस्थळी चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात घागरेदार लांब पोषाख परिधान केलेली सोनाक्षी सिन्हा खचितच सुंदर दिसते. इरशाद कमिलचे सुमधुर बोल असलेले हे गाणे अर्जित सिंगने गायले आहे. दिग्दर्शक ए. आर. मुरुगाडोस्स यांचा ‘हॉलिडे’ हा चित्रपट अॅक्शन-थ्रिलर प्रकारातील आहे. अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त या चित्रपटात एका छोट्याशा पण महत्वपूर्ण भूमिकेत गोविंदादेखील आहे. ‘थुप्पाक्की’ या प्रसिध्द तमिळ चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटाची निर्मिती विपुल शहा यांची आहे. जुनच्या ६ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या ‘हॉलिडे’ चित्रपटाचा अजय देवगणच्या ‘अॅक्शन जॅक्शन’ चित्रपटाबरोबर संघर्ष होण्याची शक्यता आहे.
पाहा गाण्याचा व्हिडिओ:

Story img Loader