‘कौन बनेगा करोडपती’सारख्या क्विझ शोमधून छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर आता बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपली जादू पसरविण्यासाठी तयार झाले आहेत. परंतु, यावेळी ते पूर्णपणे एका वेगळ्या रुपात दिसणार आहेत. अनुराग कश्यप यांच्या ‘युध्द’ नावाच्या मालिकेमध्ये अमिताभ बच्चन अभिनय करताना दिसणार आहेत. नाटकीय घडामोडींनी भरलेल्या या मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित झाला असून, तो अतिशय चित्तवेधक असा आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे युधिष्ठीर सरकारच्या व्यक्तिरेखेत दिसतात, जे स्वत:च्या अंतर्मनाशी झगडता झगडता कॉर्पोरेट जगतातील अन्य प्रतिस्पर्ध्यांशीसुद्धा लढा देताना नजरेस पडतात. या मालिकेत के. के. मेनन, सारिका आणि नवाझउद्दीन सिद्दीकी यांच्यासुद्धा भूमिका आहेत. कॉर्पोरेट जगताच्या पार्श्वभूमीवर बेतण्यात आलेल्या या मालिकेत युधिष्ठीर या व्यावसायिकाचा व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनातील प्रवास आणि संघर्ष दर्शविण्यात आला आहे. बॉलिवूडमधील नामवंत मंडळी ज्याप्रकारे छोट्या पडद्याकडे आकर्षली जात आहेत, त्यावरून छोट्या पडद्यावरील मनोरंजनात मोठ्याप्रमाणावर बदल होण्यार असल्याचे संकेत मिळत आहेत. अमिताभ बच्चन साकारत असलेल्या युधिष्ठीर सरकारच्या प्रमुख भूमिकेवरून नामकरण झालेली ‘युध्द’ ही मालिका लवकरच सोनी वाहिनीवर सुरू होत आहे.