‘बिंग सायरस’ आणि ‘कॉकटेल’सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक होमी अदाजानिया फाइंडिंग फॅनी नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर फाइंडिंग फॅनीद्वारे प्रथमच एकत्र काम करत आहेत. चित्रपटात अर्जुन कपूर सॅव्हिओ दी गामा नावाच्या मॅकेनिकची भूमिका साकारत आहे, तर दीपिका गोव्यातील एका तरुणीची भूमिका साकारत आहे. या दोघांमधील खुसखुशीत संवाद आणि विनोदी प्रसंग या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर आणि अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यातील अनेक विनोदी प्रसंग या ट्रेलरमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे नसिरुद्दीन शाह यांच्या अभिनयाची चुणूकदेखील अनुभवता येते.
पाहाः दीपिका, अर्जुन सांगत आहेत का बघावा ‘फाइंडिंग फॅनी’चा ट्रेलर
पार्श्वभूमीवर चालणारे ‘ओ फेनी रे’ हे गाणे या धमाल ट्रेलरला अधिक आकर्षक बनवते. ‘फाइंडिंग फॅनी’ हा चित्रपट म्हणजे, गोव्यामध्ये आपापल्या बालपणीच्या मित्राच्या शोधात निघालेल्या या पाच जणांची कथा आहे. त्यांचे मित्र तर त्यांना भेटत नाहीत, परंतु त्यांचा २० मिनिटांचा हा प्रवास जवळजवळ दीडतास चालतो. सैफ अली खान निर्माता असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन होमी अदाजानिया याचे असून, २०१३ च्या ऑक्टोबरमध्ये चित्रीकरणास सुरुवात झालेला हा चित्रपट केवळ ४१ दिवसात पूर्ण झाला. १२ सप्टेंबर रोजी ‘फाइंडिंग फॅनी’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.