भारतीय वंशाची हॉलिवूड अभिनेत्री फ्रिडा पिंटोचा अभिनय असलेल्या ‘डेजर्ट डान्स’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रसिद्ध झाला असून, चित्रपटाची कथा अफसिन घाफ्फारिअन या नर्तकाच्या सत्यघटनेवर आधारीत आहे. समाजाचा दबाव असतानादेखील काही मित्र एकत्र येऊन नृत्याचा सराव करताना या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात, ज्यात फ्रिडा पिंटोचादेखील समावेश असतो. चित्रपटातील अफसिनचे मुख्य पात्र रेसे रिशी हा अभिनेता साकारत आहे. ट्रेलरमध्ये अफसिनचा लहानपणापासूनचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. लहानपणी शाळेत नृत्याचा सराव करताना आढळल्याने त्याला शिक्षा करण्यात आल्याचे दृष्य ट्रेलरच्या सुरुवातीला पाहायला मिळते. परंतु, नृत्याप्रतीची त्याची आवड किंचितही कमी होत नाही. मायकल जॅक्सनसारख्या जगप्रसिद्ध नर्तकांचे व्हिडिओ पाहून तो नृत्याची कला आत्मसात करतो. कालांतराने काही मित्रांच्या मदतीने तो स्वत:ची नृत्यसंस्था स्थापना करतो. ज्यात फ्रिडा पिंटोचादेखील समावेश असतो. रिचर्ड रेमंड यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात नाझनिन बोनिआदी, टॉम कुल्लेन आणि मारमामा कॉर्लेट यांच्यादेखील भूमिका आहेत. १० एप्रिल रोजी अमेरिकेतील काही निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट १७ एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
पाहा डेजर्ट डान्सचा ट्रेलर