‘धूम ३’ च्या चित्रपटकर्त्यांनी युट्यूबवर चित्रपट आणि चित्रीकरणाशी निगडीत व्हिडिओ एका पाठोपाठ एक प्रसिध्द करण्याचा धडाका लावला आहे. चाहत्यांची या व्हिडिओंना पसंती देखील मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर, कतरिनाचे ‘धूम मचाले’ गाणे, आमिरने व्यक्तिरेखेवर घेतलेली मेहनत, ‘मलंग मलंग…’ गाणे आणि आमिर व कतरिनाच्या अॅक्रोबॅट अॅक्टसाठी घेतलेल्या मेहनतीचा व्हिडिओ असे काही व्हिडीओ प्रसिध्द केल्यावर आता त्यांनी आमिरच्या ‘टॅप डान्स’चा व्हिडिओ प्रसिध्द केला आहे.
चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला आमिर खान, ‘साहिर’ नावाच्या चोराची व्यक्तिरेखा साकारत आहे. आपल्या अभिनय कौशल्यासाठी प्रसिध्द असलेल्या आमिरचे नृत्य कौशल्य, ‘धूम २’ मधील नृत्यनिपूण अभिनेता हृतिक रोशनच्या तुलनेत फारच कमी आहे. या व्हिडिओमध्ये आमिर सोलो प्रकारातला ‘टॅप डान्स’ करतांना दिसतो. ‘मिस्टर परफेक्टशनिस्ट’ म्हणून ख्याती असलेल्या आमिरने उत्कृष्टरित्या हा डान्स केला आहे. एका ‘वेअरहाऊस’सदृश्य जागेमध्ये पायातील बुट जोर-जोरात आपटून धूळ उडवत संगिताच्या तालावर आमिर नृत्य करताना दिसतो.

खास ‘टॅप डान्स’ नृत्यप्रकार शिकण्यासाठी आमिर ऑस्ट्रेलियाला गेला होता. आमिरने टॅप डान्स प्रशिक्षणाचा व्हिडिओ टि्वटवर पोस्ट केला आहे.  ‘टॅप डान्स’मध्ये निपुणता मिळविण्यासाठी आमिरने घेतलेले कष्ट या व्हिडिओत दिसतात. ‘धूम ३’ चित्रपटाचे दिगदर्शन विजय कृष्ण आचार्य यांचे असून, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्या देखिल भूमिका आहेत.

Story img Loader