सलमान खानचा सिनेमा म्हटल्यावर आजकाल त्याच्या चाहत्यांसकट सर्व प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार ते चांगलेच ठाऊक असते. ‘दबंग’ सलमान प्रतिमा आणि ‘फूल टू अ‍ॅक्शन’, जोडीला थोडासा विनोदाचा पुचाट तडका आणि फक्त सलमानभाईंचा पडद्यावरचा ‘लार्जर दॅन लाइफ’ वावर हे त्याच्या चाहत्यांना अपेक्षित असले तरी आता त्या तोचतोचपणाचा कंटाळाही येतोच. म्हणूनच ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘किक’ सिनेमात फक्त सलमान एके सलमान पाहण्यापेक्षा अधिक कलावंतांची फळी पाहायला मिळते. एकापेक्षा जास्ती लेखकांनी एकत्रित पटकथेची खिचडी शिजवली असली तरी सलमानच्या प्रतिमेच्या परिघाबाहेर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही.
‘किक लागणे’ म्हणजे काय हे सर्वाना चांगलेच माहीत असून हीच ‘किक’ चित्रपटातली आपल्या नायकाला म्हणजेच देवीलाल सिंगला हवीहवीशी असते. सतत काहीतरी थरारक आणि इतरांपेक्षा वेगळे करण्याची मजा यावी म्हणून तो नाना उद्योग करतो. उद्योग म्हणजे काय इमारतीच्या गच्चीवरच्या कठडय़ावर उलटी सायकल चालवत फिरणे वगैरेसारखे जगावेगळे काहीतरी करून लक्ष वेधून घेण्याची या देवीलाल सिंगला भारी हौस आहे. दबंग सलमानची प्रतिमा या चित्रपटातही कायम आहे हे वेगळे सांगायला नकोच. तर देवीलाल सिंगला ‘किक’ लागली तर तो काहीही करतो किंवा किक लागेल अशाच गोष्टी करण्याचा त्याला नाद आहे. तो एका शायना मेहरा नावाच्या तरुणीच्या प्रेमात पडतो. पण किक नाही लागली म्हणून नोकऱ्या सोडणाऱ्या देवीलालशी तिचे लग्न कसे होणार याची तिला चिंता पडलेली असते. नीट काहीतरी कर, व्यवस्थित चारचौघांसारखे नोकरी करून पैसे कमाव मग आपण लग्न करू. नाहीतर आपला संसार कसा होणार, असा तिचा सरळसाधा प्रश्न असतो. पण देवीलालला ते मान्य नसते. म्हणून मग तो आमूलाग्र बदलतो आणि डेव्हिल नाव धारण करून तिच्यासमोर येतो. एका भलत्याच चांगल्या कारणासाठी देवीलाल ‘डेव्हिल’ बनतो. मग देसी सलमान थेट पोलंडमध्ये वॉर्सा या चकाचक युरोपीय शहरात गर्भश्रीमंतांना लुटतो. जगभरातील पोलीस त्याच्या मागावर असतात. मुंबईहून पोलीस अधिकारी हिमांशू त्यागीसुद्धा त्याचा माग काढतो. मग आपला नायक त्याला चकवा देत कधी त्याला समोरून आव्हान देत दबंग सलमान आपल्या हिकमती दाखवतो.
मुळातल्या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटाद्वारे साजिद नाडियादवाला दिग्दर्शनात उतरला आहे. परंतु, मूळ चित्रपट असूनसुद्धा हिंदी रिमेक करण्यासाठी त्याने चेतन भगतपासून राजन अरोरापर्यंतच्या लेखकांच्या फळीची मदत घेतली आहे.
सलमानच्या चित्रपटाची नायिका म्हणजे तिला काही काम असण्याची शक्यताच नाही. आतापर्यंत सोनाक्षी सिन्हाबरोबर सलमानची जोडी हिट ठरली होती. मात्र जॅकलिन फर्नाडिसने साकारलेली शायना मेहरा म्हणजे एकदमच बिनडोक अभिनेत्री म्हणावे लागेल. हॉलीवूड चित्रपटांप्रमाणे वेगवान अ‍ॅक्शन, चोर-पोलीस प्रकार, महागडय़ा गाडय़ांसह पोलंडमधील रस्त्यावर पाठलाग असे दाखविण्याऐवजी आपला नायक थेट डबलडेकर बसमधून जातो आणि विशेष म्हणजे स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पलायन करणारा हा नायक वाटते लहान मूल घेऊन चाललेल्या एका महिलेचा जीव वाचवतो आणि बस एका इमारतीत घुसवतो वगैरे दाखविले आहे. ‘जय हो’प्रमाणेच या चित्रपटातही देवीलाल सिंग एका तथाकथित उदात्त कारणासाठी ‘डेव्हिल’ बनला आहे. हे उदात्त कारण समजल्यावर सलमानचे चाहते निश्चितच आनंदित होऊन शिटय़ा वाजवतीलही. परंतु, यातून सिनेमा म्हणून काहीच नवीन दाखविण्यात आलेले नाही. एका प्रसंगात किक लागण्याच्या देवीलालच्या सवयीला कंटाळून नायिका शायना मेहरा म्हणते ‘तुम अनझेलेबल हो’. असाच सगळा प्रकार प्रेक्षकालाही सहन करावा लागतो.
या चित्रपटातली चांगली बाब म्हणजे सलमानलाच अखंड पडदाभर पाहण्यापेक्षा नवाझुद्दिन सिद्दिकी हा मुख्य खलनायक आणि पोलिसाच्या भूमिकेतील रणदीप हुडा, मिथुन चक्रवर्ती असे कलावंतही पाहायला मिळतात. नवाझुद्दिनने साकारलेला खलनायक, त्याच्या विचित्र लकबी यामुळे प्रेक्षकांना आवडून जाईल. रणदीप हुडानेही चोख कामगिरी बजावली आहे. सलमानचा आणखी एक मसालापट असला तरी त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. किक
निर्माता-दिग्दर्शक – साजिद नाडियादवाला
पटकथा लेखक – रजत अरोरा, केईथ गोम्स, साजिद नाडियादवाला, चेतन भगत
छायालेखक – अयानंका बोस
संगीत – हिमेश रेशमिया, मीट ब्रॉस अंजान
कलावंत – सलमान खान, जॅकलिन फर्नाडिस, रणदीप हुडा, नवाझुद्दिन सिद्दिकी, संजय मिश्रा, मिथुन चक्रवर्ती, अर्चना पूरणसिंग, विपिन शर्मा, सौरभ शुक्ला, रॉकी वर्मा, सुमोना चक्रवर्ती, कविन दवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा