माधुरी दीक्षित आणि जुही चावलाची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलाब गॅंग’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षक गीताचा व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, या गीतात चित्रपटातील प्रमुख व्यक्तीरेखा माधुरी आणि जुही स्थानिक निवडणुकीत एकमेकींना आव्हान देत उभ्या असलेल्या दाखविण्यात आल्या आहेत. निवडणुकीदरम्यानचे प्रचंड तणावग्रस्त वातावरणदेखील या गाण्यात पाहायला मिळते. याशिवाय स्त्री सक्षमीकरण, स्त्रियांमधील आत्मविश्वास आणि स्त्री शिक्षणाचे महत्व असे स्त्रियांबाबतचे महत्वाचे संदेश या शीर्षक गीतात दाखविण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे स्त्रियांचे प्रश्न सोडविणाऱ्या अशाच प्रकारच्या स्त्री-संघटनेवर आधारित सदर चित्रपटात माधुरी ‘रज्जो’ नावाच्या स्त्री-संघटन प्रमुखाची भूमिका साकारत आहे. तर, गावकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या ‘सुमित्रा देवी’ या राजकीय नेत्याची भूमिका साकारणारी जुही चावला पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.
‘गुलाबी’ या शीर्षक गीतात माधुरी गावातील दुर्गम प्रदेशात जाऊन स्त्रियांना स्वावलंबन आणि आत्मसन्मानाचा संदेश देताना दिसते, तर दुसरीकडे जुही चावला चतुर राजकीय नेत्याप्रमाणे कटकारस्थान करताना दिसते. सौमिक सेनने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे शब्द नेहा सराफ हिचे असून, मलोबिका ब्रह्माने गायले आहे. अनुभव सिन्हा आणि अभिनय देव निर्मित ‘गुलाब गॅंग’ चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

Story img Loader