रवी जाधव यांच्या ‘टाईमपास’ चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी युट्यूबवर टाकण्यात आला, तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवर झळकताच पहिल्या तीन दिवसांतच त्याला लाखाच्यावर हिट्स मिळाल्या. या चित्रपटाच्या ट्रेलरची नेटिझन्समध्ये जोरात चर्चा सुरू असून, अनेकांनी तो फेसबुकवरही शेअर केला आहे.
‘दुनियादारी’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर ‘झी टॉकिज’ आता ‘टाईमपास’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची कथा ‘टाईमपास’मध्ये पाहायला मिळणार आहे. कोवळ्या वयात मनात उमलणारी प्रेमाची भावना, ते प्रेम मिळवण्यासाठीची धडपड आणि दुसरीकडे पालकांचा होणारा विरोध या बाबी अतिशय रंजक पद्धतीने यात मांडण्यात आल्या आहेत. ‘टाईमपास’ म्हणून सुरु झालेली दगडू आणि प्राजक्ताची हळुवार प्रेमकथा पुढे काय स्वरूप घेते हे या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
रवी जाधव यांची कथा-पटकथा-संवाद असलेल्या या म्युझिकल लव्हस्टोरीमधील प्रेमाचा मूड जपणारी गाणी चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. ‘एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन’च्या या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, उदय सबनीस, सुप्रिया पाठक, भूषण प्रधान, उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका असून, प्रमुख भूमिकेत ‘बीपी’ फेम प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकर ही जोडी दिसणार आहे. ‘बालक पालक'(बीपी) या चित्रपटामधून मुलांच्या भावविश्वाचा एक वेगळा पैलू मांडणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास'(टीपी) हा चित्रपट येत्या ३ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, तुर्तास युट्यूबवरील या चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.

Story img Loader