कधी कधी आपण सर्वस्व पणाला लावून एखाद्या गोष्टीचे किंवा समस्येचे उत्तर शोधत असतो. मात्र, अचानक ती गोष्ट किंवा ते उत्तर आपल्यापाशीच असल्याचा साक्षात्कार होतो आणि ‘तुज आहे तुजपाशी’ या उक्तीचा प्रत्यय येतो. ‘पीके’ चित्रपटातील ‘बॅटरी रिचार्ज’ या गाण्याच्यानिमित्ताने दिग्दर्शक राजू हिराणी यांना असाच काहीसा अनुभव आला.
या चित्रपटात आमिर साकारत असलेल्या ‘पीके’ या व्यक्तिरेखेच्या मते, नृत्य तुमच्या शरीर आणि मनावरचा ताण हलका करते. त्यामुळे नृत्य हे एकप्रकारे तुमची बॅटरी रिचार्ज करण्याच काम करते. ‘पीके’च्या एकुण व्यक्तिरेखेचा बाज आणि स्वभाव पाहता राजू हिराणींना या गाण्यासाठी काही अनोख्या आणि पठडीबाहेरच्या नृत्याच्या स्टेप्स अपेक्षित होत्या. नृत्यात वेगळेपण असावे यासाठी राजू हिराणींनी यापूर्वी बॉलिवूडने आजपर्यंत कधीही न आजमवालेल्या नृत्यदिग्दर्शकांना पाचारण केले आणि त्यांना ‘पीके’च्या व्यक्तिरेखेला साजेशी नृत्याची अदा सुचवायला सांगितले. एवढ्यावर भागले नाही म्हणून दिग्दर्शकाने चक्क चित्रपटाच्या संपूर्ण टीमला या कामासाठी जुंपले. मग सेटवर असताना आमिर, अनुष्का, नृत्यदिग्दर्शक यांच्यापासून ते स्पॉटबॉय, तंत्रज्ञ अशा प्रत्येकाने आपापल्या परीने करून दाखवलेली नृत्याची अदाकारी कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली. मात्र, इतके सगळे करूनही मनासारखी किंवा अनोखी वाटावी अशी एकही नृत्याची अदा राजू हिराणींना सापडत नव्हती. ‘बॅटरी रिचार्ज’ हे गाणे पीकेच्या भन्नाट व्यक्तीमत्वाला आणि वेडेपणाला न्याय देणारे ठरावे यासाठी, ते उत्तमरित्या चित्रित होणे अत्यंत आवश्यक होते.
इतके सारे प्रयत्न करून झाल्यावरदेखील अपेक्षीत निकाल मिळत नव्हता. एकेदिवशी या गाण्याबाबत चर्चा सुरू असताना चित्रपटाचा नृत्यदिग्दर्शक बॉस्कोने एक वेगळा प्रयत्न करण्याचा घाट घातला. त्याने चक्क राजू हिराणींनाच या गाण्यावर नृत्य करण्यासाठी पाचारण केले आणि अहो आश्चर्यम! राजू हिराणींनी पहिल्याच प्रयत्नात एक भन्नाट नृत्य अदाकारी सादर करून सगळ्यांना थक्क केले. विशेष म्हणजे राजू हिराणींनी साकारलेली नृत्य अदाकारी ‘बॅटरी रिचार्ज’ या गाण्याचा आत्मा ठरली. त्यामुळे नृत्यदिग्दर्शक म्हणून राजू हिराणींचा करिष्मा पडद्यावर अनुभवायचा असेल तर, चित्रपटगृहात जाऊन ‘पीके’ बघितलाच पाहिजे.
पाहा: कोण ठरला ‘पीके’चा बॅटरी रिचार्ज?
कधी कधी आपण सर्वस्व पणाला लावून एखाद्या गोष्टीचे किंवा समस्येचे उत्तर शोधत असतो. मात्र, अचानक ती गोष्ट किंवा ते उत्तर आपल्यापाशीच असल्याचा साक्षात्कार होतो आणि 'तुज आहे तुजपाशी' या उक्तीचा प्रत्यय येतो.
First published on: 18-12-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch out battery recharge dance from pk behind the scenes