बॉलिवूडमधील तारे-तारकांच्या उपस्थितीत शाहरूख खानच्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटाच्या ट्रेलरचे १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. ‘भारतीयत्व’ हा चित्रपटाचा मूळ गाभा असल्याने ‘इंडियावाले’ ही या ट्रेलरच्या अनावरणाची मुख्य थिम असणार आहे. दिवाळी दरम्यान प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण मुंबईतील ‘सहारा स्टार’ हॉटेलमध्ये भव्य कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची घोषणा ‘रेड चिली एन्टरटेन्मेंट’द्वारे करण्यात आली. यावेळी शाहरूख खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, सोनू सूद, बोमन इराणी आणि विवान शहा ही चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर चित्रपटाची दिग्दर्शक फराह खान आणि चित्रपटाला संगीत देणारी विशाल-शेखर ही संगीतकारांची जोडीदेखील उपस्थित राहणार आहे. हा अनावरण सोहळा ‘हॅपी न्यू इयर’ प्रेझेंटस् ‘इंडियावाले’ सेलिब्रेशनवर आधारित असणार आहे. याविषयी चित्रपटाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भारतीयत्व हा चित्रपटाचा मूळ गाभा असल्याने ‘इंडियावाले’ सेलिब्रेशनचा भाग म्हणून, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण करण्यात आले होते. ट्रेलर अनावरण सोहळ्यात ‘इंडियावाले’वर आधारित खास कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. जगभरातून जास्तीत जास्त दर्शकांनी चित्रपटाचे ट्रेलर पाहावे, यासाठी चित्रपटकर्त्यांद्वारे डिजिटल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर याविषयीची प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेदेखील समजले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा