या वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षीत सिनेमा म्हणून पद्मावती सिनेमाकडे पाहिले जाते आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा सिनेमा अनेक कारणांनी उत्सुकता ताणून धरणारा ठरला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या व्यक्तिरेखेची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहेच. शिवाय भन्साळींच्या इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमातीलही भव्य सेट कसा असेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. या सिनेमाचे घूमर हे पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. हे संपूर्ण गाणे दीपिकावर चित्रीत करण्यात आले आहे. दीपिकाने आतापर्यंत केलेल्या सर्वात कठीण डान्सपैकी हा डान्स असल्याचे म्हटले जात आहे.
श्रेया घोषालने हे गाणे गायले असून खुद्द भन्साळी यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. दीपिकाने या गाण्यासाठी घूमर एक्सपर्ट ज्योती डी. तोमर यांच्याकडून हे नृत्य शिकून घेतले. ज्योती स्वतः घूमरचे क्लासेस घेतात. या गाण्याला खास राजपुताना लूक देण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाण्यावर नाचणं दीपिकासाठी सर्वात कठीण काम होते. या गाण्यात दीपिका एकूण ६६ वेळा स्वतःभोवती फिरताना दिसते. या गाण्यासाठी तिने फार जड कपडे घातले होते तसेच तिने घातलेले दागिनेही वजनदार होते.
या गाण्याबद्दल बॉलिवूड लाइफशी बोलताना दीपिका म्हणाली की, संजयसरांनी दिलेल्या आतापर्यंतच्या गाण्यांपैकी हे सर्वात कठीण गाणे आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाची सुरूवात याच गाण्यापासून झाली. मी त्या पहिल्या दिवसाचे चित्रीकरण कधीच विसरु शकत नाही. पहिल्या दिवसाचे चित्रीकरण करताना जी भावना होती तिच भावना मी आजही अनुभवत आहे.
घूमर हा एक राजस्थानी नृत्यप्रकार आहे. राजस्थानी महिला आनंदाच्या प्रसंगी हा नृत्य प्रकार करतात. राजपूताना मुली लग्नानंतर सासरी प्रवेश करतानाच्या समारंभात हा नृत्य प्रकार करतात. १ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. यात रणवीरने अल्लाउद्दीन खिलजी ही खलनायकी भूमिका बजावली आहे. तर शाहिद कपूरने पद्मावतीच्या पतीची म्हणजे राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारली आहे.