बॉलिवूडचा सिरिअल किसर म्हणून प्रसिद्ध असलेला इमरान हाश्मी त्याच्या नेहमीच्याच स्टाईलमध्ये परततोय. ‘राजा नटवरलाल’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे अधिकृत ट्रेलर शुक्रवारी प्रसिद्धा झाले. या आधी इमरान हाश्मी ‘घनचक्कर’ या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालनबरोबर दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली नाही. आता ‘राजा नटवरलाल’ चित्रपटाद्वारे इमरान हाश्मी आणि ‘जन्नत’ या त्याच्या चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल देशमुख पुन्हा एकत्र आले आहेत. या आधी इमरान आणि कुणालने ‘जन्नत’, ‘जन्नत २’ आणि ‘तुम मिले’सारखे हिट चित्रपट दिले आहेत. इमरान हाश्मीला ‘राजा नटवरलाल’मध्ये त्याच्या नेहमीच्याच अंदाजात पाहणे म्हणजे त्याच्या चाहात्यांना एक पर्वणीच असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये परेश रावलदेखील पाहायला मिळतात. चित्रपटात परेश रावल हे फसवणुकीच्या धंद्यातील इमरानचे गुरू दाखविले आहेत. ‘राजा नटवरलाल’मध्ये इमरान हाश्मी लोकांची फसवणूक करणाऱ्या एका माणसाची व्यक्तिरेखा साकारत आहे. परेश रावल हे इमरानचे या धंद्यातील आदर्श आहेत. ते इमरानला या धंद्यातील काही गुपिते आणि कला शिकवतात, ज्या योगे इमरान या धंद्यातील सर्वात वरच्या पातळीवर जाऊन बसतो. ‘युटीव्ही मोशन पिक्चर्स’चे सिध्दार्थ रॉय कपूर चित्रपटाचे निर्माता असून, इमरान हाश्मी आणि परेश रावल व्यतिरिक्त या चित्रपटात हुमैमा मलिक जीनाच्या भूमिकेत, दीपक तिजोरी राजू अण्णाच्या तर के के मेनन वर्धा यादवच्या भूमिकेत दिसणार आहेत. ऑगस्ट महिन्याच्या २९ तारखेला ‘राजा नटवरलाल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पाहा ट्रेलर :

Story img Loader