आजपर्यंत गायक सोनू निगम याने बॉलीवूड चित्रपटांमधील अनेक गाण्यांना आपल्या सुमधूर आवाजाचा साज चढवला आहे. मात्र, हाच सोनू निगम जर एखाद्या भिकाऱ्यासारखा रस्त्यावर गाण्यासाठी बसला तर काय होईल, याची कल्पना करून पाहा. अनेकांना ही कल्पना रूचणार नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबईत हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी सोनू निगमचा आवाज ऐकून त्याच्याभोवती बघ्यांची गर्दी झाली खरी, पण कोणीही सोनू निगमला ओळखू शकले नाही. या सगळ्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘द रोडसाईड उस्ताद’ असे शीर्षक असणारा हा व्हिडिओ ‘बिंग इंडियन’ या डिजिटल चॅनलतर्फे तयार करण्यात आला आहे. यामध्ये सोनू निगमला एका वयोवृध्द भिकाऱ्याच्या वेशात जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाण्यासाठी बसविण्यात आले होते. मेकअप केल्यामुळे सोनू निगम एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे दिसत होता. त्यामुळे कोणीही त्याला ओळखू शकले नाही. मात्र, अनोळखी वेषातील सोनूने रस्त्यावर गायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या सूरांनी अनेकांची पावले जागच्याजागी थबकली. अनेकजण त्याठिकाणी रेंगाळून सोनूचे गाणे ऐकत होते, काहीजणांनी त्याला भूक लागली आहे का, अशी विचारपूसही केली. व्हिडिओच्या चित्रीकरणानंतर बोलताना सोनूने आपण लोकांच्या या प्रतिसादाने खूपच भारावून गेल्याचे सांगितले.

Story img Loader