बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन , नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विद्या बालन या तिघांचा बहुचर्चित ‘TE3N’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एकुणच ट्रेलर पाहता हा चित्रपट रंजक, गुंतागुंतीचा आणि रहस्यमय असेल याची कल्पना येते. ट्रेलरच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन त्यांच्या लहान नातीचा टेपमधील आवाज ऐकताना दाखविण्यात आले आहेत. यानंतर ट्रेलरमध्ये अनेक वेगवान घडामोडी घडताना दिसतात. अमिताभ बच्चन यांची नात एंजल हिचे झालेले गुढ अपहरण आणि त्यानंतर आठ वर्षांनी तशाचप्रकारे दुसऱ्या लहान मुलीचे झालेले अपहरण अशा घडामोडी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. मात्र, ट्रेलरमधील घटनांचा वेग प्रचंड असल्यामुळे या सगळ्याची संगती लावता येत नाही. त्यामुळेच आता प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. याशिवाय, ट्रेलरमध्ये चर्चमधील फादरची भूमिका साकारत असलेला नवाजुद्दीन सिद्दिकी आणि पोलिसाच्या भूमिकेतील विद्या बालन प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. रिभू दासगुप्ता यांचे दिग्दर्शन असणारा हा चित्रपट सुरूवातीला २० मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, याच्या प्रदर्शनाची तारीख १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Story img Loader