पाच चार तीन दोन एक… आणि वाट पाहणे संपलेले आहे! हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा अभिनय असलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाच्या सिझलिंग पोस्टरला सिनेरसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असताना, आता सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हृतिक आणि कतरिनाने साकारलेली उत्कृष्ट अशी हाणामारीची थरारक दृश्ये अचंबित करणारी आहेत. इमारतीच्या गच्चीवरून उडी मारण्यापासून ते रस्त्यावरून फॉर्म्युला वन कार वेगाने पळविण्यापर्यंत हृतिकने सर्व काही लिलया केले आहे. हृतिकचे फ्लायबोर्डवरून पाण्यातून बाहेर येतानाचे दृश्य तर निव्वळ अप्रतिम.
‘धूम-३’गर्ल आणि याआधी हृतिकबरोबर ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटात दिसलेली अभिनेत्री कतरिना कैफदेखील स्टंटबाजीमध्ये मागे नाही. खलनायकांबरोबरच्या हाणामारीची आणि बाईकवरून पाठलाग करतानाची तिने आणि हृतिकने एकत्र साकारलेली दृश्ये अप्रतिम झाली आहेत. यातील बाईकवरचे एक दृष्य पाहताना ‘नाईट अॅण्ड डे’ चित्रपटात कॅमेरून डिआझ आणि टॉम क्रुझ यांनी साकारलेल्या बाईकवरील थरारक दृष्याची आठवण होते. याआधी झोया अख्तरच्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटात या जोडीने मोठ्या पडद्यावर ‘आग लगा दी’ असा परफॉर्मन्स दिला होता, आता त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी ते पुन्हा एकत्र आले आहेत. चित्रपटात कतरिना आणि हृतिकची जोडी आकर्षक दिसते हे सांगाण्याची आवश्यकता नाही. पिळदार शरीर आणि आकर्षक दिसण्यामुळे त्याला ‘ग्रीक गॉड’ असे संबोधिले जाते, तर ती बॉलिवूडची ‘बार्बी डॉल’ आहे.
‘नाईट आणि डे’ या हॉलिवूडपटावरून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या ‘बँग बँग’ चित्रपटाचे थायलंड, ग्रीस आणि अबू धाबी अशा अनेक ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे.

Story img Loader