गायत्री हसबनीस
पालक म्हणून पाळीव प्राण्यांचा सांभाळ करणे कसे असते याचा अनुभव देणारी ‘पेट पुराण’ ही वेबमालिका नुकतीच सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली असून या मालिकेला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. यानिमित्ताने हिंदी-मराठी दोन्हीकडे विविध भूमिकांमधून चर्चेत असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर एका नव्या भूमिकेत आणि वेगळा विषय मांडू पाहणाऱ्या वेबमालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘पेट पुराण’चे किस्से, गमतीजमती याबद्दल तिने मारलेल्या गप्पा.
‘पेट पेरेिन्टग’ वा पाळीव प्राण्यांचे पालकत्व म्हणजे नक्की काय? त्याचा अनुभव तसेच एकूणच त्याभोवती फिरलेले नाटय़ आणि गंमत ही ‘सोनी लिव्ह’वरील ‘पेट पुराण’ या वेबमालिकेतून प्रेक्षकांसमोर आली आहे. अदिती म्हणजेच सई ताम्हणकर आणि अतुल म्हणजे ललित प्रभाकर या वेबमालिकेत पाळीव प्राण्यांचे पालक आहेत. मराठीत पहिल्यांदाच असा वेगळा विषय ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे. पाळीव प्राण्यांचे पालकत्व आणि तरुण जोडपे हा विषय निवडताना, त्यानुसार प्रत्यक्ष पाळीव प्राण्यांबरोबर काम करताना आलेले अनुभव आणि किस्से याबद्दल सई अगदी मनमोकळेपणाने बोलते.
आपल्या भूमिकेविषयी सांगताना सई म्हणाली, ‘‘मी अदिती हे पात्र निभावते आहे. अतुल आणि अदिती हे आजच्या काळातील जोडपं आहे आणि त्यांना कदाचित असे वाटतेय की, त्या दोघांना मुले नको आहेत; पण.. आपल्याला कोणी तरी पाहिजे म्हणून ते पेट्स दत्तक घ्यायचा निर्णय घेतात. मग त्यांना दत्तक घेतल्यानंतर दोघांना काय गोष्टी जाणवतात तो अनुभव म्हणजे ‘पेट पुराण’ आहे.’’ खरं तर ‘पेट पुराण’ ही कथा या वेबमालिकेचे दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांची वैयक्तिक गोष्ट असल्याचे या वेळी सईने सांगितले. ‘‘कुठल्याही कथेला असा एक वैयक्तिक कोपरा असला की ती नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. आणखी एक गमतीदार बाब लक्षात आली ती म्हणजे या वेबमालिकेचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा आम्हाला असेही कळले, की आजूबाजूच्या ओळखीपाळखीतल्या दहा जणांपैकी नऊ जण तरी पेट पेरेन्ट्स आहेत जे खरे तर आम्हाला माहिती नव्हते, असे ती सांगते.
‘‘एखादा पाळीव प्राणी घरात असणे म्हणजे एखादे तान्हे बाळ घरात असण्यासारखे आहे. बाळाप्रमाणेच त्यांचीही काळजी घ्यावी लागते तसेच औषधपाणी पाहावे लागते. घरी ते एकटे असले तर त्यांच्या काळजीपायी कोणाला तरी सांगून जायला लागते. शहराबाहेर जायचे असल्यास त्यांची दुसरीकडे कुठे तरी सोय बघावी लागते. फक्त एकच गोष्ट असते की, आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही; पण देवाने त्याबाबतीतही त्यांना एक चांगले वरदान असे दिले आहे, की ते त्यांच्या हालचालींमधून अशा अनेक गोष्टी व्यक्त करू शकतात, की ज्या आपण माणसे बोलूनही करू शकणार नाही. आपण मनुष्यप्राणी स्वत:ला खूप हुशार समजतो तसेच माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे असे विज्ञानही म्हणते तर या देणगीचा माज न करता त्याप्रति विनम्रता बाळगली पाहिजे हे मला ‘पेट पुराण’ करताना नव्याने उमगले,’’ अशी कबुली सईने या वेळी दिली. पेट्स या विषयावर पाश्चात्त्य चित्रपटांमध्ये खूप विषय मांडले गेले आहेत. आपल्याकडे खूप चोखंदळ आणि मोजक्याच चित्रपटांतून हा विषय उमटला आहे. त्यामुळे आपल्याच आयुष्यातील एक भाग असलेली ही न बोलणारी पेट्स मंडळी यांच्यावर ‘पेट पुराण’च्या निमित्ताने एक कलाकृती येते आहे, याचा विशेष आनंद सईने व्यक्त केला.
‘पेट पुराण’मध्ये सई आणि ललितसमवेत त्यांचे पेट्स हेही सहकलाकार आहेत, असं म्हटलं तर ते अजिबातच चुकीचे ठरू नये. तेव्हा या नव्या सहकलाकारांसमवेत काम करण्याच्या अनुभवाविषयी सई म्हणते, ‘‘पाळीव प्राणी एक सहकलाकार म्हणून आमच्याशी जोडले गेले. त्यांच्याइतके उत्स्फूर्त सहकलाकार दुसरे कोणी असू शकतील, असे मला वाटत नाही. त्यांच्याबरोबर चित्रीकरण करत असताना असे नसते की, आपण त्यांना अमुक एक हालचाल करायला सांगितली आहे आणि ताबडतोब ते त्याप्रमाणे करतील. त्यामुळे अशा वेळेला जर त्यांनी एखादी वेगळी हालचाल केलीच तर मला काय त्या क्षणी वेगळे सुचेल आणि मी त्या हालचालीवर काय प्रतिक्रिया देईन याची तयारी मी केली. या प्रक्रियेत एक हजरजबाबीपणा लागतो जो ललितमध्ये आहे. कदाचित तो माझ्यामध्येही असावा. त्यामुळे एक प्रकारे हा प्रयत्न सफल झाला,’’ असे या वेळी सईने सांगितले. पाळीव प्राण्यांना घेऊन एखादा विषय पडद्यावर मांडणे हे खूप धाडसाचे असल्याचेही तिने सांगितले. ‘‘आपण चित्रीकरण करत असताना माणसांना सतत सूचना करू शकतो, परंतु प्राण्यांच्या बाबतीत कोणत्याही सूचना करणे हे निव्वळ कठीण आहे. हा विषय पडद्यावर आणल्याबद्दल मी ज्ञानेशचे आभार मानते, कारण मुळात असा विषय आपल्या आसपास घडत असतो, पण त्यावर आजपर्यंत कोणीच काही बनवलं नाही. ज्ञानेशच्या डोक्यात मात्र ही कल्पना विकसित झाली आणि आता ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे याचा मला विशेष आनंद आहे,’’ असे म्हणत सईने दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांचे भरभरून कौतुक केले. खरे तर ज्ञानेश यांच्याबरोबर ‘डेट विथ सई’ आणि ‘राक्षस’नंतर ‘पेट पुराण’ या तिसऱ्या प्रकल्पात सई एकत्रित काम करते आहे.
आपली स्पर्धा जगाशी..
ओटीटीवर आता आपण जगभरचा मसाला इतका कोळून प्यायलो आहोत, की आपण आता आपल्या मुळांकडे परतलो आहोत. त्यामुळे आता विषय आणि मांडणीतला साधेपणा हा ओटीटीवरही उतरू लागला आहे. हा ट्रेण्ड नक्कीच आहे आणि तो बदलतच राहणार. मला वाटतं आता या चौकटीत जो आशय निर्माण होतोय तो महत्त्वाचा आहे, कारण आता आपली थेट स्पर्धा ही जागतिक आशयाशी आहे. आता प्रादेशिकच्या पलीकडे जात तेवढय़ाच तोडीस तोड आशय तयार करावा लागतोय.
कलाकारांसाठी सध्याचा काळ सर्वात उत्तम आहे. पुढे दहा वर्षांत चित्रपटांच्या दुनियेत काय चलतीत असेल हे काही आपल्याला माहिती नाही. त्यामुळे मला असे वाटते आता जितके सहकार्याने काम करता येईल तितके कलाकारांनी काम करून घ्यावे. जितके प्रयोग शक्य आहेत ते करावेत. जितके वेगवेगळय़ा धाटणीचे काम करता येईल तितके करावे. ओटीटीने ही दारे सर्वासाठी खुली केली आहेत. आता मराठी, हिंदी, तमिळ कलाकार असा फरकही राहिलेला नाही. सगळे कलाकार कुठलाही शिक्का न लागता एक रेषेत येऊन काम करत आहेत. हे खूप आधीच व्हायला पाहिजे होते, पण हे किमान आता घडते आहे याचा आनंद वाटतो
-सई ताम्हणकर