‘नेटफ्लिक्स’वरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनमधील काही दृश्यांत माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह आशय असल्याचा आरोप केला गेला होता. याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. आता या सीरिजचा दुसरा सिझन येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिझनमध्येही राजकीय टोलेबाजी आहे का या प्रश्नाचं उत्तर अभिनेता सैफ अली खानने दिलं आहे. या उत्तरासोबतच त्याने ‘नेटफ्लिक्स’वर बंदीची भीतीसुद्धा व्यक्त केली आहे.

‘मला वाटतं आम्ही त्याबाबत सावधरित्या काम करत आहोत. दुर्दैवाने माझ्या भूमिकेच्या वाटेला फारसे आक्षेपार्ह संवाद आले नाहीत. पण त्यात (राजकीय गोष्टींचा संदर्भ घेत) थोडेफार संवाद आहेत आणि त्यातसुद्धा आम्ही काळजी घेतली आहे. पण (जर) निवडणुकीच्या वेळी एखादी समस्या उद्भवली तर नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉनवर बंदी येऊ शकते. मला आशा आहे की यावर कधीही बंदी घातली जाणार नाही कारण बहुतांश दिग्दर्शकांना, निर्मात्यांना त्यांच्या कामासाठी याहून चांगला प्लॅटफॉर्म सापडणार नाही,’ असं सैफ पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनसाठी निर्मात्यांनी अधिक काळजी घेतल्याचंही सैफने यावेळी सांगितलं. ‘आमच्यावर बंदी यावी अशी आमची इच्छा नाही. हा शो चालू नये असंही आम्हाला वाटत नाही. त्यामुळे आम्हाला वादात काही रस नाही. आमची कथा चांगली आहे. वादविवाद निर्माण करण्यापेक्षा लोकांनी हा सिझन पाहावा आणि त्याचा आनंद घ्यावा हीच आमची इच्छा आहे,’ असं त्याने सांगितलं.