मै परेशान.., दारू देसी.., लत लग गयी..आणि अगदी अलीकडचेच सांगायचे झाले तर बलम पिचकारी..अशी एकापेक्षा एक हिट गाणी देणारी शाल्मली खोलगडे ही मराठमोळी गायिका बॉलिवूडमध्ये अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. पण, असे असले तरी बॉलिवूडमध्ये जोपर्यंत आपण गायलेले गाणे प्रदर्शित झाल्यावर ते आपल्याच आवाजात आहे याची खातरजमा होत नाही, तोपर्यंत आपल्या गाण्यांबद्दल बोलण्यात काही अर्थ नसतो, असे शाल्मलीने ‘वृत्तांत’शी बोलताना स्पष्ट केले.
शाल्मलीने नुकतेच रोहित खैतान निर्मित ‘प्राग’ या आगामी चित्रपटासाठी झेक गाणे गायले आहे. प्रसिध्द जुन्या झेक गाण्याच्या सुरावटींवर बसवलेले हिंदी शब्दातील गाणे हे माझ्यासाठी एक आव्हान होते. कारण, मूळ सुरावट झेक असल्याने काही काही ठिकाणी गाण्यातले शब्दच कमी-जास्त होत होते. अशावेळी गाताना चाल जुळवून कशी घ्यायची, ही मोठी समस्या होती. पण, मूळ सुरावटच इतकी भावमधूर आहे की ते गाण्यातही एक मजा आली, असे शाल्मलीने सांगितले. बॉलिवूडच्या चांगल्या चित्रपटांमधून गाणी मिळत आहेत. मात्र, सध्या हिंदी चित्रपट संगीतात इतके वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत की जरा नवीन, वेगळा आवाज मिळाला की आधी गायलेले गाणे रद्द करून नव्या आवाजात गाणे रेकॉर्ड केले जाते, तेच गाणे बाहेरही येते तोपर्यंत मूळ गायकाला पत्ताच नसतो. त्यामुळे आपण रेकॉर्डिग केले म्हणजे गाणे आपले असेल, हा भ्रम न बाळगता मिळेल ते गाणे आत्मविश्वासाने सादर करणे हाच फं डा मनाशी ठेवून आपली वाटचाल सुरू असल्याचे तिने सांगितले.
बॉलिवूडचे पाश्र्वगायन हे आपले स्वप्न कधीच नव्हते असे सांगणाऱ्या शाल्मलीला इंग्रजी गाणी जास्त आवडतात. याच आवडीतून तिने गायलेली दोन इंग्रजी गाणी संगीतकार अमित त्रिवेदीच्या हातात पडली आणि तिचा आवाज ऐकून त्याने इशकजादेंचे ‘मै परेशान’ तिच्याकडे सोपवल्याचा किस्साही ती सांगते. एकीकडे गायनाची कारकीर्द सुरूच ठेवून आपल्या मूळ आवडीसाठी लवकरच आशु पाठक यांच्या ‘ट्र स्कूल ऑफ म्युझिक’ मध्ये समकालीन संगीताचे धडे घेण्याचा मानसही तिने यावेळी व्यक्त केला.