मलायका अरोरा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाची चर्चा अखेर खरी ठरली आहे. तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या घटस्फोटासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी मलायका आणि अरबाज यांनी संयुक्त निवेदन काढल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. आम्ही आत्तापर्यंत याबाबत मौन बाळगून होतो. मात्र, आता या सगळ्यामुळे आमच्या कुटुंबियांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळेच सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आम्ही हे निवेदन जारी करत असल्याचे अरबाज आणि मलायकाने म्हटले आहे.
या निवेदनात दोघांनीही त्यांच्या नात्यासंदर्भातील अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण दिले आहे. अरबाजची व्यवसायिक घसरण, कधी हुमा कुरेशीची खान कुटुंबियांशी वाढलेली जवळीक, मलायकाच्या लाइफस्टाइलविषयी असलेली खान कुटुंबाची नाराजी, मलायकाचे एका उद्योगपतीशी असलेले कथित अफेअर अशी निरनिराळी कारणे मलायका आणि अरबाजमधील दुरावा वाढण्यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा होती. मात्र, या सगळ्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले आहे. आम्ही वेगळे होणार असलो, तरी आमचे पुढे काय होणार, कोण कसे राहणार, हे सर्व आम्हाला ठरवू द्या. जे काही होईल, त्याबाबत आम्ही चर्चेने निर्णय घेऊ, असे या निवेदनात म्हटले आहे.
मलायका १८ वर्षांची होती, तेव्हा ती अरबाजला पहिल्यांदा भेटली होती. एका जाहिरातीच्या शुटिंगच्या निमित्ताने १९९२ साली दोघांची पहिली भेट झाली. या जाहिरातीनंतर दोघेही प्रेमात पडले. पाच वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर दोघेही विवाहबंधनात अडकले होते.