प्रेमपटांचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक इम्तियाज अलीची प्रस्तुती आणि लेखन असलेली ‘डॉ. अरोडा – गुप्त रोग विशेषग्य’ ही वेबमालिका औत्सुक्याचा विषय ठरली आहे. चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण प्रेमकथा हाताळणारा हा दिग्दर्शक ओटीटी माध्यमावर आशय-विषयाच्या बाबतीतही नवे प्रयोग करू पाहतोय. समाजात लैंगिकता हा कायम लपूनछपून चर्चा करण्याचा विषय राहिला आहे. त्यामुळे अनेकदा समस्या असूनही लहानथोर मंडळी आतल्या आत कुढत जगताना दिसतात. मार्गदर्शनाची, औषधांची अनेकदा गरज असूनही त्यासाठी वैद्यकीय मदत घेतली जात नाही. याच विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करणारी ‘डॉ. अरोडा – गुप्त रोग विशेषग्य’ ही वेबमालिका सोनी लिव्हवर दाखल होणार आहे. कुमुद मिश्रा, विवेक मुश्रन, विद्या माळवदे, संदीपा धर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेबमालिकेचं लेखन इम्तियाजने केलं आहे. त्याच्या चित्रपटातील संगीताप्रमाणेच या वेबमालिकेचे संगीतही वैशिष्टय़पूर्ण आहे.
कधी – २२ जुलै, कुठे – सोनी लिव्ह
कलाकार – कुमुद मिश्रा, विवेक मुश्रन, विद्या माळवदे, संदीपा धर.
जादूगर
जादूगर हा नवा वेबपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. जादूचे प्रयोग शिकण्यात आणि ते करून दाखवण्यात रस असलेल्या मिनू जादूगर या तरुणाची कथा या चित्रपटात आहे. त्याचे प्रेम सिद्ध करण्यासाठी खेळाची कुठलीही आवड नसताना मिनूवर फुटबॉलचा सामना खेळण्याची जबाबदारी येऊन पडते. खेळ आणि जादूगर होण्याचं स्वप्न या दोन टोकाच्या गोष्टीत अडकलेला मिनू यावर कसा मार्ग काढणार? त्याची प्रेमकथा यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं जादूगरमधून मिळणार आहेत. या वेबपटाचे दिग्दर्शन समीर सक्सेना यांनी केले आहे. तर पंचायत वेबमालिकेतील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या जितेंद्र कुमारची यात मुख्य भूमिका आहे.
कधी – प्रदर्शित, कुठे – नेटफ्लिक्स
कलाकार – जितेंद्र कुमार, आरुषी शर्मा, जावेद जाफरी, मनोज जोशी.
मसाबा मसाबा २
अभिनेत्री नीना गुप्ता आणि त्यांची मुलगी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता यांची कथा सांगणारे ‘मसाबा मसाबा’ या वेबमालिकेचे पहिले पर्व चांगलेच लोकप्रिय झाले होते. नीना आणि मसाबा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी या मालिकेतून लोकांनी अनुभवल्या. दुसऱ्या पर्वात मसाबा गुप्ता ते फॅशन डिझायनर मसाबा हा संघर्ष अधिक ठळकपणे पाहायला मिळणार आहे. सोनम नायर दिग्दर्शित या वेबमालिकेच्या दुसऱ्या पर्वात या दोघी मायलेकींबरोबर नील भूपालम, राम कपूरसारखे काही लोकप्रिय कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमधून दिसणार आहेत.
कधी – २९ जुलै, कुठे – नेटफ्लिक्स
कलाकार – नीना गुप्ता, मसाबा गुप्ता, राम कपूर, नील भुपालम, कुशा कपिलम, बरखा सिंह.