एखादा पदार्थ करताना त्यातले विविध प्रकारचे जिन्नस, त्यांचं तोलून मापून घेतलेलं प्रमाण, त्याला दिलेली माफक फोडणी पदार्थ रुचकर करते. मग त्याचसारखे अन्य पदार्थ आपण आधी चाखले असले तरी त्याची चव आपल्या जिभेवर रुळते. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘डब्बा कार्टेल’ या सात भागांच्या वेबमालिकेलाही आपली अशी खास आंबट-गोड देशी चव आहे.
ठाण्यातल्या घरगुती जेवणाचा डबा पुरवणाऱ्या मध्यमवर्गीय महिला एका अमली पदार्थांच्या मोठ्या जाळ्यात कशा अडकत जातात, त्याची ही कथा आहे. एकाच वेळी ड्रग कार्टेल आणि एका औषध कंपनीचा घोटाळा आणि त्याचा तपास या मालिकेत समांतर सुरू असतो. या औषध कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वसाहत, त्यातल्याच एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा घरगुती डबे पुरवण्याचा लहानसा उद्याोग, त्याच इमारतीत कंपनीचा मोठा अधिकारी आणि त्याची स्वत:चा वेगळा उद्याोग करणारी पत्नी, या दोन्ही घरांत काम करणारी महिला, कंपनीच्या विशिष्ट औषधाचा तपास करणाऱ्या शासकीय संस्थेचा अधिकारी, त्याला मदत करणारी पोलीस या सर्व पात्रांचे ठिपके जोडून मालिकेला आकार देणं लेखकांना सोयीचं झालं आहे. पहिले तीन-चार भाग हे ठिपके हळूहळू जोडण्यात खर्च झाल्याने मालिका संथगतीने पुढे सरकते.
भरपूर व्यक्तिरेखा या मालिकेत आहेत. त्यामुळे खरे तर ती वाहवत जाण्याची भीती होती. पण कोणतेही पात्र हरवत नाही, हे विशेष. दमदार महिला व्यक्तिरेखा ही ‘डब्बा कार्टेल’ची आणखी एक जमेची बाजू. काही सिनेमांमध्ये किंवा वेबमालिकांमध्ये महिलांचे प्रमुख पात्र असेल तर अनावश्यकपणे त्या पुरुषांप्रमाणे वागताना दाखवल्या जातात. ते इथे टाळून फार चांगलं काम केलं आहे. कारण सिनेमाचा बाजच घरगुती, मध्यमवयीन महिलांचा आहे आणि तो जपण्याचा लेखक, दिग्दर्शकाने कसोशीने प्रयत्न केला आहे. लेखकाने त्यांची ही ओळखच उलट त्यांची ताकद बनवली आहे. घरगुती महिला कायम दुर्लक्षित असतात. त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही. मुळात समाजाच्या जगरहाटीत त्यांचे अस्तित्व लपून राहिलेले असते. हीच त्यांची हे ‘कार्टेल’ चालवण्यासाठी मोठी ताकद ठरते.
फार्मा कंपनीत काम करणारा, जर्मनीला जाण्याची आस असणाऱ्या हरीची आई – शीला (शबाना आझमी) आणि पत्नी राजी (शालिनी पांडे). राजीचा डबे पुरवण्याचा उद्याोग असतो. त्यांची मोलकरीण माला (निमिषा सजायन) हे डबे पोहोचवण्याचे काम करते. नवऱ्याचे जर्मनीला जाण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यासाठी आपला हातभार लागावा, ही राजीची इच्छा. मालाला हवा असतो आदर, जो पैशांनी मिळतो, असं तिला वाटत असतं. घरात सुबत्ता असणाऱ्या आणि समाजात आदर असणाऱ्या वरुणाला (ज्योतिका) (म्हणजेच फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या बायकोला) समाजात मान असला तरी घरात नवऱ्याकडून तो मिळत नाही. तिला गृहीत धरून उलट तिच्यावतीने अनेक निर्णय तो घेत असतो.
वरुणाच्या कंपनीला जागा भाड्याने देणाऱ्या ब्रोकरकडे कामाला असणारी शहिदा (अंजली आनंद) हिच्या कामाची किंमत तिच्या बॉसला नसते. त्यामुळे त्याच्या अपरोक्ष कमिशन लाटण्याचे उद्याोग ती करत असते. या सर्व महिला या डबे उद्याोगातून सुरू झालेल्या भलत्याच धंद्यामध्ये एकत्र येतात आणि अडकतात. त्या अडकण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते बा हिची. जी शबाना आझमी यांनी लीलया पेलली आहे. अगदी थोडकंच बोलून इतर सर्व अभिनय त्यांनी केवळ नजरेतून केला आहे. राजीच्या घरात शांतपणे वावरणारी बा ते पूर्वाश्रमीची माफिया त्यांनी आपल्या दमदार अभिनयातून साकारली आहे. तिची मैत्रीण लिलेट दुबे हिचे पात्रही उल्लेखनीय आहे. ज्यांना ‘द ग्रेट इंडियन किचन’ सिनेमातील निमिषा सजायनची भूमिका आवडली आहे, त्यांच्यासाठी निमिषाची मालाची भूमिका सुखद धक्का आहे. फार्मा कंपनीतील मोडेला या बंदी असलेल्या रसायनांपासून बनवलेल्या औषधाचा माग काढणारे अधिकारी पाठक (गजराज राव) आणि पोलीस (प्रीती) सई ताम्हणकर यांची पात्रे आणि अभिनयही कसदार आहे. फरहान अख्तर आणि रितेश साधवानी याचे निर्माते आहेत आणि हितेश भाटियाने दिग्दर्शन केले आहे.
ओटीटीवर ‘ब्रेकिंग बॅड’ ही मालिका ज्यांनी पाहिली आहे त्यांना डब्बा कार्टेल पाहताना नकळत ब्रेकिंग बॅडचे प्रसंग तरळत राहतात. बा राजीच्या खोलीत आल्यावर पंखा लावते आणि नोटा हवेत उडतात, किंवा बा चा डायलॉग की, ‘हो केला मी बिझनेस, कारण आवडायला लागला. असं वाटतं की मी पुन्हा जिवंत झाले’-हा संवाद, प्रसंग ब्रेकिंग बॅडच्या वॉल्टर व्हाइटचे आहेत. तेथे लोकांना चिकन विंग्जच्या डब्यातून ड्रग पुरवणारा गस फ्रजिं होता, येथे तो मसाला मेकरच्या रूपात आलाय. मात्र या गाजलेल्या मालिकेतील ट्विस्टचा प्रेक्षकांना अंदाज बांधता येत नाही. ‘डब्बा कार्टेल’मध्ये असे धक्के देता आलेले नाहीत. काही प्रसंग, प्लॉट ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात.
‘ब्रेकिंग बॅड’, ‘नार्कोस’, ‘वीड’चा प्रभाव डब्बा कार्टेलच्या ‘मेकर्स’वर दिसतो. अर्थात ज्यांनी या मालिका पाहिलेल्या नाहीत, त्यांच्यासाठी डब्बा कार्टेलची अस्सल देशी मेजवानी उत्तम. पहिल्या सीझनपेक्षा दुसरा सीझन कदाचित अधिक रोमांचक, रंगतदार असण्याची शक्यता आहे.
डब्बा कार्टेल वेबमालिका
ओटीटी : नेटफ्लिक्स दिग्दर्शक : हितेश भाटिया