‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्यावहिल्या मराठी ओटीटी वाहिनीने कार्य विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘प्लॅनेट मराठी’च्या आशयनिर्मिती संबंधित समितीवर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते अभिजीत पानसे यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. बुधवारी पानसे यांच्या नियुक्तीबरोबरच त्यांनीच लिहिलेल्या ‘रानबाजार’ या गाजलेल्या मालिकेचा दुसरा भाग लवकरच येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवाय, जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या ‘पुरुष’ या नाटकावर वेबमालिकेची निर्मिती करणार असल्याचेही पानसे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतिभावंत लेखक जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले आणि रघुवीर तळाशिलकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘पुरुष’ हे नाटक १९८२ साली पहिल्यांदा रंगमंचावर आले होते. पुरुषी मनोवृत्ती आणि त्याला बळी पडणाऱ्या स्त्रिया या विषयावर भाष्य करणारे हे नाटक  नाना पाटेकर, रिमा लागू, उषा नाडकर्णी यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांच्या अभिनयाने गाजले. पुढे मराठी, हिंदी चित्रपट ते हिंदीत नाटक अशा विविध माध्यमांतून हे नाटक रसिकांसमोर येत राहिले. आता ओटीटी या नव्या माध्यमावर वेब मालिकेच्या स्वरूपात हे नाटक पाहता येणार आहे. अभिजीत पानसे यांच्या रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि श्रीरंग गोडबोले यांच्या इंडियन मॅजिक आय यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच प्लॅनेट मराठीच्या सहकार्याने या वेब मालिकेची निर्मिती करण्यात येत असून अभिनेते सचिन खेडेकर यात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

अभिजीत पानसे यांची नियुक्ती..

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये जसे एकमेकांचे हात पकडून भव्यदिव्य कलाकृती साकारण्याचे प्रयत्न होत आहेत. असे दृश्य मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी पाहायला मिळते. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक जण स्वतंत्ररीत्या काम करतात. फार कमी असे आहेत जे एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे मराठीत भव्यदिव्य कलाकृती निर्माण करण्यासाठी एकत्रित संघटना स्तरावर प्रयत्न आवश्यक आहेत, असे पानसे यांनी सांगितले. त्याची सुरुवात म्हणून स्वत:ची निर्मिती संस्था आणि इंडियन मॅजिक आय, प्लॅनेट मराठी या तिन्ही संस्थांना एकत्र आणत ‘पुरुष’ नाटकावर आधारित वेबमालिका निर्मितीचा प्रयत्न केला जातो आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Web series on marathi drama purush zws