फेब्रुवारी महिना म्हटलं की व्हॅलेंटाइन डेचा उल्लेख ओघाने येतोच. प्रियकर किंवा प्रेयसीबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यामुळे तरुणाईमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळतो. याच धर्तीवर आधारित वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ऋचा इनामदार ही सुंदर आणि बहुगुणी अभिनेत्रीही झळकणार आहे.
ऋचाने यापूर्वी अभिनेता स्वप्नील जोशीच्या भिकारी या चित्रपटात काम केलं असून या चित्रपटानंतर लगेच तिच्या पदरात वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट पडला आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात शिवराज वायचळ हा अभिनेता ऋचासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
“भिकारी चित्रपटानंतर मधल्या काळात मी काही जाहिराती, शॉर्ट फिल्म आणि वेबसीरिजमध्ये काम केलं. या वेबसीरिज आणि शॉर्टफिल्म्स गाजल्या आणि त्यांचं विविध स्तरांवर कौतुकही करण्यात आलं. मात्र एक अभिनेत्री म्हणून मला एकाच भूमिकेत अडकून पडायचे नव्हते. अभिनयात मला स्वतःला आजमावून पाहायला आवडते. म्हणून मी स्वतःवर भाषेचं बंधन ठेवलं नाही. मला प्रत्येक भूमिका ही पहिल्या भूमिकेपेक्षा वेगळी करायची होती”, असं ऋचा म्हणाली.
पुढे ती असंही म्हणाली,” मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना जे सुख मिळतं ते कुठेच मिळत नाही. मराठीमध्ये असलेले कथानक, विषय हे खरंच खूपच प्रगल्भ आणि सुंदर असतात, आणि मराठी रसिकांना चित्रपट समजतात. जेव्हा मला या ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाबद्दल विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. चांगला विषय, नावाजलेले सहकलाकार, आणि कलेची उत्तम जाण असलेले एक संवेदनशील दिग्दर्शक असल्यामुळे मी नाही म्हणूच शकले नाही. मला पुढे सुद्धा चांगले विषय असलेल्या मराठी चित्रपटांमध्ये करायचे आहे”.
‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या केली आहे तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर ऋचा लवकरच तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित बीबीसीच्या ‘क्रिमिनल जस्टीस’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.