समाजात आत्महत्येच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेतील अपयशामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण प्रचंड आहे, गरिबीला कंटाळून, कर्जबाजारीपणामुळे लोक आत्महत्या करतात हे बातम्यांमधून आपण ऐकतो-वाचतो. याच विषयावर
मीरा ही टीव्ही चॅनलची पत्रकार आहे. पाच वर्षांपूर्वी तिची आई वारल्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. बालपणीचा मित्र शांतनू याच्याशी अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर मीराचे लग्न ठरते. लग्नाच्या दहाच दिवस आधी शांतनूचा बाहेरख्यालीपणा मीरा पाहते आणि हादरून जाते. त्यातच तिला नोकरीवरूनही काढून टाकण्यात येणार असल्याचे मीराला समजते. त्यामुळे ती आत्महत्या करायचे ठरवते. त्यासाठी झोपेच्या गोळ्यांची बाटली घेऊन घरी जाते. तेवढय़ात तिथे आनंद हा तरुण प्रकटतो. आत्महत्या यशस्वीरीत्या करायची असेल तर ‘हॅपी एण्डिंग सोसायटी’ या संस्थेचे प्रशिक्षण गरजेचे आहे असे तिला सांगतो आणि या प्रशिक्षणासाठी तिला घेऊन जातो.
आत्महत्या करणे हा गुन्हा आहे आणि म्हणूनच आत्महत्या करायचीच असेल तर त्या व्यक्तीने ती यशस्वीरीत्याच केली पाहिजे असे आनंद मीराला वारंवार सांगतो. यशस्वीरीत्या आत्महत्या करण्याच्या शिबिरात मीरा आल्यानंतर शिबिरार्थीची प्रचंड संख्या, आत्महत्येची साधनं, हे सगळं पाहून आणखी घाबरते. पण तिच्या परतीचा मार्ग बंद असतो.
या चित्रपटातून ‘यशस्वी आत्महत्या करण्याचे १०१ उपाय’ या शीर्षकाच्या पुस्तकासारखे एकेक मार्ग दाखविताना लेखक-दिग्दर्शकाने उपरोधिक संवादांचा छान वापर केला आहे. त्यामुळे चित्रपट नर्मविनोदी ठरतोच, त्याचबरोबर विषय प्रेक्षकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यात चित्रपट यशस्वी ठरला आहे.
आत्महत्या करावीशी वाटणे आणि प्रत्यक्षात आत्महत्या करणे यातला भेद चित्रपट अधोरेखित करतो. संवादांबरोबरच प्रशिक्षण शिबिरासाठी केलेले कला दिग्दर्शनही खूप काही सांगून जाते. प्रमुख व्यक्तिरेखा फक्त आनंद आणि मीरा अशा दोनच आहेत. मीराच्या भूमिकेतून अमृता खानविलकर आणि आनंदच्या भूमिकेतून स्वप्निल जोशी यांनी दिग्दर्शकाबरहुकूम अभिनय केला आहे. भारती आचरेकर यांनी आत्महत्या यशस्वीरीत्या करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाची छोटीशी भूमिका प्रभावीपणे साकारली आहे.
आत्महत्या प्रशिक्षण शिबिरात जीवनाला कंटाळलेल्या सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांची संख्या पाहूनच मीरा घाबरते. आत्महत्या करण्यासाठी नियोजनाची नितांत गरज आहे असे प्रशिक्षक सांगतात. पंख्याला गळफास लावून जीव द्यायचा की उंच इमारतीवरून उडी मारून जीवन संपवायचे, हाताची नस कापून जीव गमवायचा की विष प्राशन करायचे, यासारखे अनेकविध मार्ग प्रशिक्षणातून मीराला समजत जातात आणि आत्महत्या करावीशी वाटण्यामागची आपली कारणेही किती तकलादू आहेत हेही मीराला उमगते, तेव्हा तिचा विचार बदलतो.
उपरोधिक संवाद आणि एकूण हा विषय हाताळण्यासाठी चित्रपटात उपरोधिक शैली याचा वापर लेखक-दिग्दर्शकानी केल्याने चित्रपट प्रभावी ठरतो. आत्महत्येचा विचार करण्यापेक्षा जगण्यातला आनंद घ्यायला शिका, समस्यांना तोंड द्यायला शिका, असा संदेश देताना मेलोड्रामा दाखविलेला नाही, ही आणखी एक जमेची बाजू ठरते. परंतु या चित्रपटातले गुपित उलगडल्यानंतर शेवटाकडे जाताना दिग्दर्शकाने फिल्मीगिरीचा आधार घेतला आहे, तो खटकतो.
पदार्पणातील उत्तम दिग्दर्शन, प्रशिक्षण शिबिरासाठी वापरलेले उत्तम सेट्स, उत्तम संवाद आणि प्रमुख कलावंतांचा अभिनय यामुळे चित्रपट संयत करमणूकही करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा