‘साथीया’, ‘पेज ३’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स’सारख्या चित्रपटातून संध्या मृदुल ही अभिनेत्री समोर आली आणि अवघ्या काही दिवसातच तिने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. छोट्या मोठ्या भूमिकेतून संध्या प्रेक्षकांसमोर येत होती. गेली काही वर्षं ती मनोरंजनसृष्टीपासून लांब आहे. त्याचनिमित्ताने हिंदुस्तान टाईम्सच्या पत्रकाराने संध्याशी तिच्या फिल्मी करकीर्दीविषयी गप्पा मारल्या. या एक्सक्लूझीव्ह मुलाखतीमध्ये संध्याने बॉलिवूडमध्ये काम करताना तिला आलेले अनुभव सांगितले.
मध्यंतरी अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ‘चोली के पिछे क्या है’ गाण्यामागील एक अनुभव सांगितला होता. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सुभाष घाई यांनी नीना यांच्या शारीरिक ठेवणीवर टिप्पणी केली होती. तो किस्सा चांगलाच चर्चेत होता. संध्यालासुद्धा बॉलिवूडमध्ये काम करताना तसाच अनुभव आल्याचं तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. ‘पेज ३’ आणि ‘रागिणी एमएमएस २’च्या चित्रीकरणादरम्यान संध्याच्या शरीराबद्दल टिप्पणी करण्यात आली तेव्हाचा किस्सा संध्याने सांगितला.
संध्या म्हणाली, “पेज ३ आणि रागिणी एमएमएसच्या वेळी माझे स्तन मोठे नव्हते त्यामुळे मला दोन्हीवेळेस त्यासाठी ब्रेस्ट पॅड वापरायचा सल्ला दिला होता. रागिणी एमएमएस मधील पात्राची ती गरज होती त्यामुळे मला ते करणं भाग होतं. पण आजही मला माझ्या स्तनांचा आकार वाढवण्यासाठी सल्ला दिला जातो. लोकांना माझी त्या भूमिकेसाठी गरज असते पण त्यांना माझ्या स्तनांचा आकारही मोठा हवा आहे. उद्या कुणी येऊन मला माझ्या नाकाचं ऑपरेशन करायला सांगेल, त्यामुळे मला हे आवडत नाही. दुसऱ्यासाठी मी माझ्या शरीरात बदल करणार नाही. म्हणूनच मी जास्त इथे रमत नाही. मी फक्त पैसे कमावण्यासाठी कधीच या चित्रपटसृष्टीत आले नव्हते, माझ्यावर बरीच आर्थिक संकटं आली तेव्हादेखील मी तो मार्ग निवडला नाही.”
आणखी वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकबद्दल मोठी अपडेट; महेश मांजरेकर दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बाहेर
आपण हिरॉईन मटेरियल म्हणून या क्षेत्रात राहायचं नाही असं संध्याने ठरवलं होतं. तिने चक्क यश चोप्रा यांच्या ‘साथीया’ चित्रपटातील भूमिका नाकारली होती. विवेक ओबेरॉय, राणी मुखर्जी यांच्याबरोबरीनेच साथीयामध्ये संध्याचीही महत्त्वाची भूमिका होती. संध्याने प्रथम नकार दिला होता. याविषयी संध्या म्हणते, “यशजी यांनी जेव्हा मला साथीयामधील भूमिका दिली तेव्हा मी तातडीने ती नाकारली होती. तेव्हा मला कमर्शियल चित्रपटात फारसा रस नव्हता. यशजी म्हणाले की ही भूमिका तू केलीच पाहिजेस आणि त्यांनी मला दिग्दर्शक शाद अलीला भेटण्यास सांगितलं. त्यानंतर मी जास्त विचार न करता तो चित्रपट केला आणि मला तो करताना खूप मजा आली शिकायलाही मिळालं.”