महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित केलेल्या ‘लयपश्चिमा’ या सांगीतिक कार्यक्रमातून पाश्चात्त्य संगीताचा खजिना उलगडला गेला. अभ्यासक आणि संग्राहक डॉ. आशुतोष जावडेकर यांनी पाश्चात्त्य संगीताचे सूर उलगडून दाखविले.
डॉ. जावडेकर यांनी पॉप, रॉक, जाझ, हिपहॉप अशा विविध लोकप्रिय ठरलेल्या पाश्चात्त्य संगीताची दृक्श्राव्य माध्यमातून उपस्थित रसिकांना ओळख करून दिली. त्याच वेळी व्यासपीठावर याला भारतीय संगीताच्या संदर्भाची जोड देण्यात येत होती. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी एक आगळी संगीत मेजवानी ठरली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्याची झलक दाखविण्यात आली. पाश्चात्त्य शैलीचा वापर असलेल्या या गाण्यातील भारतीय संगीताची ओळख या वेळी करून देण्यात आली. कार्यक्रमाच्या सादरीकरणात डॉ. जावडेकर यांनी जाझ संगीत प्रकाराचे विविध टप्पेही उलगडले. जाझ संगीताच्या प्रसारात विशेष भूमिका बजाविलेल्या माइल्स डेव्हिसची ओळखही या वेळी त्यांनी करून दिली. ‘कंट्री म्युझिक’ची ओळख ‘माळ्याच्या मळ्यामंदी’ या गाण्यातून करून देताना डॉ. जावडेकर यांनी हा संगीत प्रकार भारतात अद्याप फारसा परिचित नसल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विचार/संवेदना या संगीतातून समोर येत असल्याचेही ते म्हणाले. शायना ट्वेन यांनी गायलेली ‘कंट्री म्यूझिक’ प्रकारातील काही गाणी, ‘रॉक म्यूझिक’, संगीतकार ए. आर. रहेमान यांनी भारतीय संगीतात याचा केलेला वापर, पॉप संगीत, रिकी मार्टिन याने या प्रकारात गायलेले स्पॅनिश गाणे, पॉप संगीताचा बादशाह मायकेल जॅक्सन याचा ‘मूनवॉक’ आदींनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.

Story img Loader