भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर.. क्रांतिकारक, समाजसुधारक, हिंदूसंघटक, ज्वलंत साहित्यिक-महाकवी, भाषाप्रभू अशा अनेकविध पैलूंनी भारतीय समाजमन ढवळून काढणाऱ्या या दूरदर्शी नेतृत्वाचे विचार हे आजच्या काळाशी सुद्धा तितकेच साधर्म्य सांगणारे आहेत. त्यांच्या जाज्वल्य विचारांची आणि वैचारिक लढ्याची गाथा लवकरच रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. रिटेक अनलिमिटेड फिल्म प्रॉडक्शन आणि औरस अवतार एंटरटेनमेंट प्रस्तुत रोहित शेट्टी, अतुल परब निर्मित आणि रुपेश कटारे, नितीन गावडे दिग्दर्शित ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ या चित्रपटाचा गीतध्वनीमुद्रण प्रकाशन सोहळा नुकताच चित्रपटातील कलाकार-तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी सावरकरांवरील जीवनपटाची एक खास झलकही दाखवण्यात आली. तसेच ‘जय जय शिवराय’ या गीताचं सादरीकरण ही करण्यात आलं. मनीष चव्हाण यांनी वर्तमानपत्रांच्या कागदापासून तयार केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
“सावरकरांचे देशप्रेम त्यांचे विचार भावी पिढीला समजायलाच हवेत. त्यांचे विचार आजच्या तरुणांनी मनात रुजवायला हवेत”, असं अभिनेते अविनाश नारकर यांनी यावेळी सांगितलं. “सध्याच्या तरुणाईच्या चंगळवादी वृत्तीमुळे ती भरकटत जात आहे. या पार्श्वभूमीवर सावरकरांचा हा चित्रपट आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरू शकेल”, असं मत माजी पोलिस सहआयुक्त वाय. सी पवार यांनी व्यक्त केलं. गगन बाया, नीती सिंग आणि शीतल शेट्टी यांचे निर्मिती सहाय्य लाभलेल्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ मध्ये सावरकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या एका ध्येयवेडया तरुणाची कथा रेखाटण्यात आली आहे. शरद पोंक्षे, अविनाश नारकर, विवेक लागू, अतुल तोडणकर, श्रीकांत भिडे, सारा श्रवण आदींच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. येत्या १७ एप्रिलला ‘व्हॉट अबाऊट सावरकर?’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘व्हॉट अबाऊट सावरकर ?’
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी पर्व म्हणजे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर..
First published on: 27-02-2015 at 01:27 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What about savarkar