‘साधू आगाशे’ म्हणजे नाना पाटेकर आणि त्यांनी साकारलेला साधू म्हणजे ‘अब तक छप्पन्न’ असं सगळं एका वाक्यात सांगितलं की.. दहशतवाद्यांना आपल्या हुशारीने टिपणारा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आठवतो. चित्रपटाच्या नावापासूनच सुरुवात होते ती एका ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट’ची कथा म्हणून. मात्र, चित्रपट जिथे संपतो तिथे ती एका नाराज पोलीस अधिकाऱ्याची, हतबल बापाची, कर्तव्यात सर्वस्व हरवलेल्या पतीची शोकांतिका असते. शिमित अमिन दिग्दर्शित ‘अब तक छप्पन्न’ चित्रपटाने तेव्हा प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं आणि नानांचा ‘साधू आगाशे’ हा नवा नायकही दिला होता. आज दहा वर्षांनी साधू आगाशेचं पुढे काय झालं असेल?, या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक एजाज गुलाब यांनी केला आहे.
मुळात, शिमितने दिग्दर्शित केलेली साधूची कथा लोकांच्या मनात चांगलीच घर करून आहे. त्यामुळे सिक्वलमध्ये साधूच्या व्यक्तिरेखेला तितक्याच जोरदारपणे पुढे नेणं हे पटकथेच्या स्तरावरचं मोठं आव्हान होतं आणि खरं सांगायचं तर ‘साधू आगाशेचं पुढे काय झालं’ या एकाच वाक्यावरून सिक्वलची कथा सुरू झाली आहे, असं एजाज म्हणतात. मी स्वत: साधू आगाशेचा चाहता होतो. साधू आगाशेसारखा एक प्रतिभावान, सामथ्र्यशाली पोलीस अधिकारी जो दहा वर्षे नाराज होऊन दूर राहिला आहे. तो जेव्हा सेवेत पुन्हा परततो तेव्हा त्याच्याबरोबर काम करणारे अधिकारी, ज्या माफियांना त्याने नेस्तनाबूत केलं होतं त्यांची मानसिकता, जुने मित्र आणि नातेवाईकांबरोबरचे नवे संबंध या सगळ्या गोष्टींमध्ये ‘साधू आगाशे’च्या परतण्याने नवं काहीतरी घडणार आहे. असा पोलीस अधिकारी प्रत्यक्षातसुद्धा केवळ तणावाची परिस्थिती नियंत्रण करण्यात अनुभवी राहत नाही. तो एकाच वेळी कामावरचा दबाव, कुटुंबियांची मानसिकता आणि राजकीय दबावही तितक्याच हुशारीने सांभाळू शकतो. ‘अब तक छप्पन्न २’मध्ये साधू आगाशेचे हे असे अनेक कंगोरे दाखवण्यावर आपण भर दिला असल्याचे एजाज यांनी सांगितलं. पहिल्याच दिग्दर्शकीय चित्रपटात नाना पाटेकर, मोहन आगाशे, विक्रम गोखले यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवही तितकाच खासा होता, असं ते म्हणतात.
नाना पाटेकरांसारखा कलाकार रागीट, आक्रमक स्वभावाचा आहे, असं कित्येकांनी सांगितलं होतं. मात्र, या चित्रपटाची जानच हा कलाकार आहे. नाना म्हणजेच साधू आणि म्हणूनच तो चित्रपट हे वास्तव होतं. त्यामुळे त्यांना कथा ऐकवतानाच धडधड होत होती. पण, साधूची पुढची कथाच त्यांना पसंत पडली आणि चांगली सुरुवात झाली. मात्र, माझी कथा, माझी टीम पूर्ण तयारीनिशी चित्रीकरण करत होती. ज्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही आमच्यावर नाराजी व्यक्त केली नाही. उलट, नानांशी चर्चा करत खेळीमेळीने चित्रीकरण पार पडलं, असा आपला अनुभवही एजाज यांनी सांगितला. ‘अब तक छप्पन्न’ जिथे संपला अगदी त्या क्षणापासून सिक्वलची सुरुवात झाली आहे. दहा वर्षांनंतर मोहन आगाशे हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. साधूचा मुलगा आता मोठा झाला आहे आणि त्याच्याच हट्टावरून साधू पुन्हा सेवेत परतणार आहे. तुम्ही ज्या कामासाठी चपखल होतात तेच काम तुम्हाला परत येऊन केलं पाहिजे, या मुलाच्या हट्टावरून दहा वर्षांची नाराजी बाजूला ठेवत पोलिसी सेवेत परतलेला साधू आगाशे पुढे काय करणार याची कथा म्हणजे ‘अब तक छप्पन्न २’ चा हा सिक्वल आहे. नाना पाटेकर यांना यावेळी आणखी अॅक्शन रूपात पाहण्याची संधीही या सिक्वलच्या निमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा नाना आणि सलमान खान अशा दोन ताकदीच्या कलाकारांना एकत्र आणत एक चित्रपट करायचा मानस एजाज यांनी व्यक्त केला. त्यासाठी पटकथाही पूर्ण झाली आहे मात्र, सध्या लक्ष ‘अब तक छप्पन्न २’वरच केंद्रित झालं आहे हे सांगायलाही ते विसरत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा