क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी फेटाळला. आर्यनच्या जामीन अर्जावर महानगरदंडाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकत नसल्याचे न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळताना नमूद केले. आर्यनबरोबर अरबाज मर्चंट आणि मुनमुन धनेचा या दोघांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला. असं असतानाच दुसरीकडे आता यावरुन राजकारण सुरु झालं आहे.

राजकारण आणि आर्यनला पाठिंबा
सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून या छापेमारीचा भाजपाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येतोय. दरम्यान बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी आर्यन खान आणि त्याच्या वडिलांना म्हणजेच शाहरुख खानला पाठिंबा दर्शवल्याचं दिसत आहे. ऋतिक रोशन, सलमान खान, फरहान खान, रविना टंडन यासारख्या सेलिब्रिटींनी उघडपणे आर्यनलास पाठिंबा दिलाय. मात्र आता या सेलिब्रेटींच्या यादीमध्ये कायदा क्षेत्रातील एका मोठ्या नावाची भर पडलीय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनीही या प्रकरणामध्ये आर्यन खानची बाजू घेतलीय.

अमलीपदार्थ सापडलेच नसतील तर…
ईटाइम्सशी बोलताना विकास सिंह यांनी आर्यनसोबत जे काही घडत आहे ते योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. “एनडीपीएस कायदा म्हणजेच नार्कोटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्ट हा एखाद्या व्यक्तीकडे किती अमलीपदार्थ आढळून आले आहेत यावर शिक्षा निश्चित करणारा कायदा आहे. अमलीपदार्थ सापडलेच नसतील तर या प्रकरणामध्ये खटला दाखल करता येणार नाही जोपर्यंत अटकेत असलेली व्यक्ती ही अमलीपदार्थांचा पुरवठा करणारी किंवा पुरवणारी व्यक्ती असल्याचं सिद्ध झालेलं नसेल,” असं सिंह म्हणाले आहेत.

त्याच्यासोबत होतंय ते अयोग्य आहे
“आर्यन खानकडे अमलीपदार्थ सापडले नाहीत तसेच तो अमलीपदार्थांचा पुरवठा करणाराही नाहीय. या प्रकरणामध्ये तो सेवन करणारा आहे. मात्र त्यातही त्याने हे सेवन केलं आहे आहे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो कारण त्याच्या केसांच्या चाचणीमध्ये काहीही आढळून आलेले नाहीय. मला वाटतं नाही त्यांनी फार चाचण्या केल्या असतील. त्याच्यासोबत होतंय ते अयोग्य आहे,” असं सिंह म्हणालेत. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांच्याकडे अमलीपदार्थ सापडल्याच्या खटल्यामध्ये दोघांची बाजू मांडली होती.

काल न्यायालयात काय घडलं?
अशा प्रकरणांत जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार महानगरदंडाधिकाऱ्यांना नाही. तर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष सत्र न्यायालयाला आहे, असा युक्तिवाद आर्यनच्या जामीन अर्जाला विरोध करताना अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केला होता. मुख्य महानगरदंडाधिकारी आर. एम. नेरलीकर यांनी एनसीबीचा युक्तिवाद मान्य करत आर्यनला दिलासा देण्यास नकार दिला.

अर्जावर सुनावणी करण्याआधी…
आर्यनला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यावर त्याचे वकील सतीश मार्नेंशदे यांनी लगेच आर्यनच्या जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. त्यावेळी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर आर्यनने जामीन अर्ज करण्यावर एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी आक्षेप घेतला. तसेच आर्यनचा जामीन अर्ज गुणवत्तेच्या आधारे ऐकण्याआधी अशा प्रकरणांत महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर जामीन अर्ज केला जाऊ शकतो की नाही याचा निर्णय घेण्याची मागणी केली.

आर्यनकडून कोणतेही अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नाहीत
विशेष सत्र न्यायालयाला या प्रकरणी खटला चालवण्याचा आणि जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद एनसीबीने केला. त्यासाठी एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला जामीन देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला दिला. तर फौजदारी दंडसंहितेनुसार फाशी वा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचा जामीन अर्ज ऐकण्याचा अधिकार हा सत्र व उच्च न्यायालायाला आहे. परंतु तीन वर्षांहून अधिकच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्याची सुनावणी घेण्याचा आणि जामीन अर्ज ऐकण्याचा या न्यायालयालाही अधिकार असल्याचा दावा आर्यनच्या वकिलांनी केला. या प्रकरणी तर आर्यनकडून कोणतेही अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आले नसल्याकडेही त्यानी लक्ष वेधले.

Story img Loader