बाबूराव म्हणजे परेश रावल, घनश्याम म्हणजेच सुनील शेट्टी आणि राजू म्हणजेच अक्षय कुमार या तिघांचे आगंतुकाप्रमाणे एखाद्या संकटाला आमंत्रण देणे आणि त्यातून सुटण्यासाठी त्यांची केलेली हरप्रकारची ‘हेराफेरी’च्या खेळाच्या दोन भागांनी प्रेक्षकांना पोट धूरन हसायला भाग पाडले होते. लवकरच परेश रावल आणि सुनील शेट्टी या ‘हेराफेरी’चा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
आपल्या करामतींनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या ‘हेराफेरी ३’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन चित्रपटाच्या सिक्वेलप्रमाणेच नीरज वोरा करणार आहेत. २००० साली ‘रामजी राव स्पिकिंग’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेला प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हेराफेरी’ या चित्रपटामधून सतत दारूच्या अमलाखाली असलेला वेंधळा घरमालक बाबूराव, नोकरीच्या शोधात गावातून आलेला साधासरळ घनश्याम आणि झटपट श्रीमंत होण्याच्या क्लृप्त्या काढणारा राजू यांनी घातलेल्या सावळ्या गोंधळ्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले होते. त्यातील बाबूराव, घनश्याम आणि राजू या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले होते.
आजही सोशल मीडियावर बाबूरावांचे विनोद गाजताहेत. त्यानंतर २००६ मध्ये ‘फिर हेराफेरी’ नावाने आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलचे दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केले होते. आता तब्बल नऊ वर्षांने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी केली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या महिन्यापासून सुरू होणार असून या वेळी घनश्याम आणि बाबूराव हेराफेरी करण्यासाठी थेट लास वेगस, मकाऊ, दुबई आणि अबू धाबी गाठणार आहेत. ‘हेराफेरी ३’ मध्ये राजू अर्थात अक्षय कुमार नसेल तर, त्याच्या ऐवजी अभिषेक बच्चन आणि जॉन अब्राहम हे दोन नवे खिलाडी या हेराफेरीच्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत.

Story img Loader