What is Inside Oscar 2024 Goodie Bags : आज सगळीकडे मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची चर्चा पाहायला मिळत आहे. ऑस्कर २०२४ सोहळा मोठ्या दिमाखात लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ चित्रपटाने यंदा सर्वाधिक सात पुरस्कार जिंकले. या सोहळ्यात नामांकन मिळालेल्या न विजेत्यांना एक गुडी बॅग दिली जाते, या बॅगमध्ये नेमकं काय असतं? ते जाणून घेऊयात.
ऑस्कर या जगातील या सर्वात मोठ्या मनोरंजन क्षेत्रातील पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे इथून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. दरवर्षी ऑस्करच्या सर्व विजेत्यांना आणि नामांकित व्यक्तींना एक गुडी बॅग दिली जाते. यावर्षी नामांकित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या या गुडी बॅगची किंमत सुमारे १.४ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. या गुडी बॅगमध्ये काय खास आहे, ते पाहुयात.
John Cena Oscar 2024: …अन् रेसलर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, पाहा व्हिडीओ
‘मनी कंट्रोल’च्या अहवालानुसार, यावर्षी बॅगमध्ये ५० हून अधिक वस्तू आहेत. नामांकित व्यक्तींना स्वित्झर्लंडमध्ये ४१ लाख रुपये किमतीचे स्की शॅलेट लक्झरी व्हेकेशन पास मिळाले आहेत. नामांकित लोक या सहलीला नऊ लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात. ते इथे तीन रात्री घालवू शकतात. इतकंच नाही तर दक्षिण कॅलिफोर्नियातील गोल्डन डोअर स्पामध्ये सात दिवसांचा पासही यात समाविष्ट आहे, ज्याची किंमत १९ लाख रुपये आहे.
याशिवाय २७ हजार रुपये किमतीची हँडमेड हँडबॅग देखील भेट म्हणून मिळेल. एक लाख रुपयांचे पोर्टेबल ग्रिल, त्वचा घट्ट करण्यासाठी सायनोस्योरचे मायक्रो नीडलिंग ट्रिटमेंट दिले जाते, ज्याची किंमत ८.२ लाख रुपये आहे. या बॅगेतील सर्वात स्वस्त भेट रुबिक्स क्यूब आहे, ज्याची किंमत १२०० रुपये आहे.
गुडी बॅगमध्ये या भेटवस्तूंव्यतिरिक्त ब्युटी प्रोडक्ट्स, स्किन केअर प्रोडक्ट्स आणि लाइफस्टाइलशी संबंधित अनेक महागड्या ब्रँड्सच्या वस्तूही दिल्या जातात. या गुडी बॅगचा संपूर्ण खर्च ऑस्करच्या आयोजकांनी नाही तर लॉस एंजेलिसची मार्केटिंग कंपनी डिस्टिन्क्टिव्ह अॅसेटने केला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामांकित व्यक्तींना ही भेटवस्तूंनी भरलेली गुडी बॅग स्वीकारण्यास नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे.