बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखर मनी लाँडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर नोरा फतेहीची चौकशी करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे. याप्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली. यादरम्यान तिची पाच ते सहा तास चौकशी करण्यात आली असून पोलिसांनी नोराचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी नोराने ती डिसेंबर २०२० मध्ये चेन्नईमध्ये झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, असा खुलासा तिने केला.

नोरा फतेही पोलिसांनी दिलेल्या जबाबानुसार, “सुकेशची पत्नी लीना मारिया हिचा चेन्नईमध्ये स्टुडिओ आहे. या कार्यक्रमासाठी मला बोलविण्यात आले. यावेळी पैशाच्या ऐवजी आम्ही तुला कार भेट म्हणून देऊ, अशी ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी लीना मारियाने माझे पती सुकेश हे तुमचे खूप मोठे चाहते आहेत असे सांगितले होते. त्यानंतर तिने सुकेशला फोन करत त्यांचे बोलणे करुन दिले होते. त्यानंतर मला लीनाने बॅग आणि फोन भेट म्हणून दिला. तसेच महागडी बीएमडब्ल्यू गाडी भेट देण्याबद्दल घोषणा देखील केली. माझ्याकडे आधीपासूनच बीएमडब्ल्यू असल्याने मी ती माझ्या चुलत बहिणीचा पती बॉबीला भेट म्हणून दिली, ज्याची किंमत ६५ लाख रुपये होती. त्याचीही यादरम्यान चौकशी झाली आहे.”
आणखी वाचा : नोरा फतेहीच्या अडचणीत वाढ, २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तब्बल ६ तास चौकशी

“यावेळी नोराने ती सुकेशसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करायची हे तिने कबूल केले आहे. मात्र काही महिन्यांनी सुकेश तिला वारंवार फोन करायचा, त्यावेळी तिला शंका आली आणि त्यानंतर तिने त्यासोबत सर्व प्रकारचे संपर्क तोडले. यावेळी नोरा म्हणाली, मला आणि जॅकलिनला सुकेशची ओळख करुन देण्यात त्याची पत्नी जबाबदार आहे.” यानंतर पोलिसांनी तिची आणि लीनाची समोरासमोर बसून चौकशी केली. मात्र त्यावेळी त्या दोघींच्या विधानांमध्ये विरोधाभास असल्याचे समोर आले.

आणखी वाचा : ५२ लाखांचा घोडा, ९ लाखांची मांजर; २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी!

दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने पीएमएलएच्या अपील प्राधिकरणासमोर याचिका केली. माझ्यासह इतर सेलिब्रिटींप्रमाणेच नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरने भेटवस्तू दिल्या होत्या. परंतु फक्त मलाच या प्रकरणात दोषी का ठरवलं जातंय, अशी विचारणा तिने या याचिकेत केली होती.

“मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून भेटवस्तू मिळवणाऱ्या नोरा फतेहीसह इतर सेलिब्रिटींना या प्रकरणात साक्षीदार बनवलं गेलं, फक्त मलाच या प्रकरणी आरोपी म्हणून गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असं जॅकलिन फर्नांडिस म्हणाली. “माझ्या अकाउंटमधील फिक्स्ड डिपॉझिटच्या पैशांचा कोणत्याच गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. तसेच कोणत्याही गुन्ह्याच्या कथित रकमेचा वापर करून मी डिपॉझिट केले नाहीत. त्या माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या आणि कायदेशीर उत्पन्नाच्या आहेत. तसेच मी सुकेशच्या संपर्कात येण्याआधीपासून ते डिपॉझिट खात्यात ठेवलेले होते,” असं जॅकलिनने याचिकेत म्हटलं आहे.

Story img Loader